मालवण तालुक्यात ९५ शिक्षकांना नियुक्ती…
शिक्षकांच्या रिक्त पदांची समस्या अखेर दूर
मालवण
शासनाच्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीतून तालुक्यात ९५ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. जून शैक्षणिक वर्षापासून तालुक्यातील १८७ जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण ४१९ शिक्षक कार्यरत असणार आहेत. अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे व गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी दिली.
शिक्षक भरती प्रक्रियेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५५६ शिक्षकसेवकांना नियुक्त्या देण्यात आल्या. त्यापैकी ९५ शिक्षकांना तालुक्यातील शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शाळांतील रिक्त शिक्षक समस्या बहुतांशपणे दूर झाल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासासोबत शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, अन्य परीक्षा यांसह गुणवत्ता वाढीसाठी अधिकाधिक प्रयत्न करता येणार आहेत असे गटशिक्षणाधिकारी माने यांनी सांगितले.
गेली काही वर्ष शिक्षक पदे रिक्त असल्यामुळें अनेक शाळेत शिक्षकांच्या पर्यायी व्यवस्था, कामगिरी व्यवस्था करण्यात येत होत्या. आता ही समस्या दूर होणार आहे. तसेच शिक्षकांच्या रिक्त पदांच्या कालावधीत सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ तसेच सर्व शिक्षक संघटना यांनीही प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले असे सांगत गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी सर्वांचे आभार मानले.
तालुक्यातील जिल्हापरिषद शाळेत एकूण ९५ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. यात उपशिक्षक मराठी ६४, उपशिक्षक उर्दू १, पदवीधर भाषा १२, पदवीधर विज्ञान १२, प्रकल्पग्रस्त, खेळाडू ६ असे शिक्षक नियुक्त झाले आहेत.