पणजी ता. ६ होंडा सत्तरीसारख्या दूरभागातील खेड्यात राहूनही आपली प्रतिभा, साहित्य निर्मितीची शक्ती जणाऱ्या मोहनराव कुलकर्णी यांची साहित्याविषयीची ओढ कायम होती. नवनवीन साहित्यिकाला ते मार्गदर्शन करीत. निरपेक्ष वृत्तीने काम करणारा साहित्यिक हीच त्यांची खरी ओळख होती. साहित्यियेची चंद्रकळा, दायज अशा विविध नियतकालिकांव्दारे साहित्य सेवा करणारे मोहनराव खरे साहित्यिक होते. आयुष्याच्या अंतापर्यत लेखन करणारे ते एकमेव साहित्यक असावेत, अशा शब्दात त्यांना विविध वक्त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली. सत्तरीतील ज्येष्ठ साहित्यिक मोहनरावांना श्रध्दांजली वाहण्यासाठी एक सभा अलीकडेच आयोजित करण्यात आली होती.
प्रारंभी मोहनरावांच्या तसबिरीला मान्यवरांनी पुष्पे अर्पण केली. साहित्यावर निःस्सीम प्रेम करणारे मोहनराव साहित्याच्या कोणत्याही कार्यक्रमाला आमंत्रणाशिवाय उपस्थित राहत असत, असे चंद्रकांत म. गावस म्हणाले. गोमंतक मराठी साहित्य परिषदेच्या कोणत्याही कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असायची. ते वक्तशीर असायचे इतरांनीही वेळ पाळावी असा त्यांचा आग्रह असायचा. वेळ न पाळणाऱ्यांवर ते चिडायचे. साहित्यातील सर्व प्रकारांवर त्यांचे प्रभुत्त्व होते. अनेक भाषांतरे गाजली. रवींद्रनाथ, कालिदास आणि देशविदेशातील कथाकारांच्या कथा त्यांनी मराठीत आणल्या, त्यांची म्हणावी तशी कदर कुणीच केली नाही. असेही गावस यांनी सांगितले.
साहित्याला जीवन वाहून घेतलेले एक व्रतस्थ साहित्यिक म्हणजे मोहनराव. कवितांचे चालतेबोलते विद्यापीठ म्हणजे मोहनराव कुलकर्णी. भुजंगप्रयात वृत्तात गझल व कविता लिहिण्यास त्यांनी मला प्रोत्साहन दिले. साहित्यियेची चंद्रकळा या नियतकालिकासाठी ते आवर्जून माझी रचना मागून घेत व प्रसिध्दही करीत, पणजीत कोणत्याही साहित्यिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले. कार्यक्रम उशिरा संपला की आमच्या घरी मुक्काम करीत. अनेकदा त्यांचे मित्र माधवराव सटवाणी हेही त्यांच्यासमवेत असत. मग रात्री उशिरापर्यंत आमची साहित्यचर्चा चाले, त्या आठवणीने डोळे भरून येतात, असे साहित्यिक, गझलकार प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.
प्रकाश धवन, संदीप केळकर, पौर्णिमा केरकर, विठ्ठल शेळके, चित्रा क्षीरसागर, विठ्ठल पारवाडकर, आसावरी कुलकर्णी, दया मित्रगोत्री, विजय नाईक, प्रेमानंद नाईक, अनुराधा म्हाळशेकर आदींनी मोहनरावांच्या आठवणी सांगितल्या.
बाबांना अजूनही खूप लिहायचे होते. त्यांच्या काही संहिता लिहून तयार आहेत. त्यांचे काम पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली होईल. मी त्यासाठी प्रयत्न करीन असे आसावरी कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांच्या आठवणी असलेला विशेषांक प्रकाशित करण्याचा मनोदय आसावरी कुलकर्णी यांनी व्यक्त केला. नंदिनी कुलकर्णी याही यावेळी उपस्थित होत्या.