*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख…!*
*वेगाने वाढणारी पाणी टंचाई…:-*
*एक जागतिक समस्या अन् उपाय..!*
*पाण्याविना नाही प्राण..*
*पाण्याचे तू महत्त्व जाण*
*सुखी समृद्ध होईल जीवनमान*
*पाणी वाचविण्याची घे तू आण*
सजीव सृष्टीची मूलभूत गरज म्हणजे पाणी.. म्हणून तर…”पाणी हेच जीवन आहे” असंही म्हटलं गेलं आहे. मानवाला जगण्यासाठी “अन्न, वस्त्र आणि निवारा” एवढ्याच गोष्टीची आवश्यकता नसते तर “ऑक्सिजन आणि पाणी” हे देखील अत्यंत आवश्यक घटक आहेत. पृथ्वीतलावर ७१% पाणी उपलब्ध आहे. परंतु, त्यापैकी केवळ २% पाणी हे पिण्या योग्य आहे. जगाची वाढती लोकसंख्या आणि औद्योगीकरण यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी वापरले जाते, औद्योगीकरणातील बहुतांश पाणी वापर झाल्यावर वाया जाते परिणामी पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे पाण्याची बचत करणे म्हणजे पाण्याची निर्मिती अन् जलस्त्रोतांची जपणूक, संवर्धन करणे होय. आपण केवळ जागतिक जलदिन सारखे दिवस साजरे करतो, उन्हाळ्यात पाणी बचतीच्या योजना आखतो आणि उर्वरित आठ महिने वाटेल तसे पाणी वापरून पाण्याचा अपव्यय करतो..मग सांगा, असे दिवस साजरे करून आपण काय बोध घेतो..? तहान लागल्यावर विहीर खोदायला गेलं तर तहानेने व्याकूळ होऊन मरणच येईल ना..!
गेली काही वर्षे वृक्षवेलींची कत्तल करून गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. सिमेंटची जंगले वाढून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. बांधकाम व्यवसायासाठी पाण्याचा वापर आणि उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. विकसित भारत निर्माण झाला, भले मोठे सहा/आठ पदरी महामार्ग तयार झाले. परंतु नविनाची उत्पत्ती होत असतानाच जुनाट वृक्ष जे शेकडो वर्षे रस्त्यांच्या कडेला पांथस्थांना सावली देत उभे होते तेच जमीनदोस्त झाले. नवे महामार्ग उभारले परंतु नव्याने वृक्ष लागवड मात्र झाली नाही. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याने दिवसेंदिवस पर्जन्यमान घटले, पाण्याचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिग, पर्यावरणातील बदल, पाणी साठ्यांची कमतरता, वाढती लोकसंख्या, औद्योगीकरणातील दूषित पाणी नाल्यातून नदीत सोडल्याने होणारे पाणी प्रदूषण आणि पाण्याचा होणारा अपव्यय यामुळे पाणी टंचाईची भीषणता वाढत असून दुष्काळास सामोरे जावे लागत आहे. भविष्यात पाणी देखील पेट्रोल डिझेल प्रमाणे विकत घेण्याची पाळी येऊ शकते अशी भीती हळूहळू निर्माण होत आहे.
पूर्वी मोठमोठी जंगले होती. डोंगरदऱ्या हिरवाईने नटलेल्या असायच्या. त्यामुळे मौसमी वारे डोंगरावर अडविले जायचे आणि धो धो पाऊस कोसळत असायचा. मोठमोठ्या झाडांच्या मुळांमधून पाणी जमिनीत झिरपले जायचे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या पाणी साठा होत असायचा. परिणामी डोंगर माथ्यावरून नैसर्गिक झरे बारमाही वाहत असायचे. झऱ्यांचे पाणी हे गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचे निर्मळ जलस्त्रोत होते. छोट्या छोट्या नाल्यातून हे पाणी पुढे नदीला मिळायचे. त्या पाण्यावर बारमाही शेती फुलायची. शहरांमध्ये औद्योगीकरण वाढले आणि औद्योगिकरणातून निघणारे दूषित पाणी नदी नाल्यांमध्ये सोडले गेल्याने पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत म्हणून ज्ञात असणाऱ्या नद्या दूषित झाल्या. लोकांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची पाळी आली. अनेक ठिकाणी खनिज पट्टे शासनाने राखीव ठेवले. भूगर्भातून खोलवर खोदाई करून खनिज उत्खनन केले गेले. परिणामी पाण्याची पातळी खूप खोलवर गेली. जलस्त्रोत असणारे झरे, पाणवठे, विहिरी, तळी आदींची पाण्याची पातळी घटली किंबहुना जलस्त्रोत आटले, विहिरी, तळी, नद्या सुकल्या आणि पाणी संकट आ वासून समोर उभे राहिले. पश्चिम आफ्रिकेतील काही भागात पाणी साठाच शिल्लक नसल्याने पाणी वापरावर निर्बंध आलेत. भारत, इंग्लंड, चीन दक्षिण आफ्रिका, इराण, सायप्रस, कतार, ओमान आदी देशात पाणी टंचाई वाढत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पाणी टंचाई ही एक गंभीर समस्या बनली आहे.
जसजसे देश प्रगत होत गेले, विकासाची गंगा वाहू लागली, शिक्षणाने नवी पिढी सुशिक्षित सुसंस्कृत झाली, देश विदेशातील दौरे घडू लागले अन् विदेशी संस्कृती आपलीशी वाटू लागली तसतसे लोक सुधारले, लोकांचे राहणीमान उंचावले. बंगले, बिल्डिंग संस्कृती वाढीस लागली. जिथे लोकांचा कौलारू घरात १००/२०० लिटर पाणी वापर होता तिथे हजारो लिटर पाणी वापर होऊ लागला. लोकसंख्या वाढली, पाणी वापर वाढला परंतु जलस्त्रोत कसे वाढणार..? भूगर्भातील पाणी साठा वाढणार कसा?
“पाणी अडवा पाणी जिरवा” शेततळी, बंधारे सारख्या जलसिंचनाच्या योजना गैरप्रशासान म्हणा किंवा नियोजनाच्या अभावामुळे कागदावरच राहिल्या. जीवन प्राधिकरण, जलस्वराज्य, भारत निर्माण आदींवर सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले परंतु त्याचे योग्य असे फायदे दिसलेच नाहीत. उलट लोकप्रतिनिधी, मंत्री संत्री यांच्यावरच सिंचन घोटाळ्यांचे आरोप झाले. चार महिने पाऊस पडतो धरणे तुडुंब भरतात परंतु उन्हाळ्याच्या झळा बसल्या की धरणांचे पाणी तळ गाठते हे केवळ नियोजन शून्य कामामुळेच..!भारतासारख्या जलसमृद्ध देशात वाढत्या जल मागणीमुळे गोड्या पाण्याचा जलस्त्रोत मर्यादित राहिला अन् पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या भारतात पाणी संकटाचे दूरगामी परिणाम दिसू शकतील.
पाणी टंचाई ही केवळ सरकारच्या किंवा माणसांच्या अनास्थेमुळे आहे. योग्य नियोजन आणि बेदरकार पाण्याचा वापर टाळला तरीही पाणी टंचाई काही प्रमाणात दूर करता येईल. त्यासाठी पाण्याचा पुनर्वापर योजना मोठ्या प्रमाणावर गाव शहरांमध्ये राबविणे अत्यावश्यक आहे. शहरांमध्ये इमारतींमधून पाणी जास्त प्रमाणात वाया जाते. उच्चभ्रू लोकांची वाढलेली वाहने धुण्यासाठी देखील पाणी वापर, वाढला आहे. असे वाया जाणारे पाणी नाल्यात, गटारात न सोडता जलशुद्धीकरण प्रकल्प राबवून पुनर्वापर केल्यास परसबाग, उद्याने त्याचबरोबर संडास मधील फ्लश टँक आदींसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. पर्यायाने पाणी उपसा कमी होऊन पाण्याची बचत होईल. पाणी साठवण, पाणलोट व्यवस्थापन यासारखे जलव्यवस्थापन प्रकल्प राबविल्यास पाण्याचे बंद झालेले स्त्रोत पूर्ववत सुरू होण्यास मदत होईल. कूपनलिका काही काळाने पाण्या अभावी बंद पडतात अशावेळी इमारतींचे वाहून जाणारे पाणी कूपनलिकांच्या चहूबाजूंनी खड्डे खोदून खडी, वाळू आदींच्या द्वारे फिल्टर करून जिरविल्यास कूपनलिकांमध्ये पाणी साठा वाढून पूर्ववत सुरू होतील. पाण्याचे संकट दूर करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करून शाश्वत जल व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा लागेल. नदी नाल्यांमध्ये सोडले जाणारे औद्योगिक क्षेत्रातील पाण्यावर प्रक्रिया करून त्याच क्षेत्रातील बगिचा इत्यादी साठी पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन करून संरक्षण करावे लागेल. पिण्यायोग्य पाणीसाठा असलेल्या क्षेत्रात खनिज उत्खनन सारख्या प्रकल्पांना बंदी घालावी लागेल अन्यथा पाण्याची पातळी खोलवर गेल्यास त्या क्षेत्रात पाणी संकट येण्याची शक्यता वाढेल, आणि खनिजयुक्त पाणी पिण्यास आरोग्याच्या दृष्टीने ते धोक्याचे ठरेल. नागरिकांनी पाणी मुबलक उपलब्ध असतानाच योग्य प्रकारे वापर केल्यास पाण्याची बचत होऊन भर उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार नाही…शेवटी “पाण्याची बचत म्हणजेच पाणी संवर्धन..!”
दुसरा कोणी प्रचंड वापर करतो म्हणून आपणही तसाच पाणी वापर करून पाण्याचा अपव्यय न करता पाणी बचत करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी..इतर आपोआप आपले अनुकरण करतील यात शंकाच नाही..!
© दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६