विलवडे शाळेच्या संरक्षक भिंतीला डंपरची धडक…
चालक बचावला; मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
बांदा
दाणोली जिल्हामार्गावर विलवडेत अपघातचे सत्र सुरुच आहे. विलवडे नं. १ शाळेच्या संरक्षक भितीला आज डंपरने धडक दिल्याने संरक्षण भिंत पडून मोठे नुकसान झाले. हा अपघात आज सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने यात चालक बचावला. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बांदा-दाणोली रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहन चालक सुसाट वेगात जात आहेत. वेग मर्यादा नियत्रंणात नसल्याने हा अपघात झाल्याचे विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी सांगितले. सायंकाळी डंपर चालक विलवडे मार्गे बांद्यांच्या दिशेने काळ दगड घेऊन जात होता. जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा विलवडे नं. १ समोर चालकाचा ताबा सुटून संरक्षक भिंतीला डंपरची धडक बसली. यामध्ये दगडी सरंक्षक भिंत कोसळून जमिनदोस्त झाली.
अपघाताची नोंद बांदा पोलिसात करण्यात आली नाही. बांदा-दाणोली जिल्हामार्गा हा खड्डेमुक्त झाला असला तरी काही ठिकाणी रस्ता अरुंद व वळणावळणाचा,सहा गाव,अनेक शाळा आहेत. तसेच खडी वाहतूक करणारे डंपर, मालवाहतूक करणारे ट्रक,अवजड वाहने, यामुळे हा मार्ग अपघाताला नेहमीच निमत्रंण देत आहे.रस्त्यावर साईड पट्ट्यांवर सफेद पट्टे मारणे,गतिरोधक असलेल्या ठिकाणी रिफ्लेक्टर्स लावणे, आवश्यक त्या ठिकाणी रंबल्स लावणे, दिशादर्शक, वेग मर्यादा फलक लावणे अत्यआवश्यक आहे.