वजराट ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीचे खा.राणेंच्या हस्ते उद्घाटन
वेंगुर्ला :
ग्रामपंचायत म्हणजे गावाचे मंत्रालय असतं. याठिकाणी काम करणाऱ्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आपण सेवक या नात्याने काम करून गावाचा विकास करावा. केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम करा. केवळ ग्रामपंचायत इमारत सुंदर असून चालत नाही, तेथील कारभारी सुंदर असायला पाहिजे. यासाठी ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीच्या कामाकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केले.
वजराट येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, वजराटचे सरपंच महेश राणे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मनीष दळवी, वेंगुर्लाचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, अंकुश जाधव, जि.प.चे सदस्य प्रीतेश राऊळ, वसंत तांडेल, राजू राऊळ, सरपंच समिधा कुडाळकर, पप्पू परब, शंकर घारे, माजी सभापती सुचिता वजराटकर, सारिका काळसेकर, गटविकास अधिकारी उमा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राणे म्हणाले, सरपंच महेश राणे यांच्याबरोबर चर्चा करताना राणे यांनी गावात १०० टक्के लोक साक्षर असल्याचे व वीस कुटुंबे दारिद्रयरेषेखालील असल्याचे सांगितले. मात्र, येत्या वर्षभरात गावात एकही कुटुंब दारिद्रयरेषेखाली राहणार नाही यासाठी प्रयत्न करा, असे नारायण राणे यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच नितीन चव्हाण, वामन भोसले, गावातील आजी, माजी सरपंच, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानिमित्त गावातील माजी सरपंच, ग्रामसेवक, प्रतिष्ठित नागरिक यांचा सन्मान नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजन तेली यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार राजा सामंत यांनी मानले.
जिल्हा विकासाच्याबाबतीत दहा वर्षे मागे गेला
राणे पुढे म्हणाले, आजच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर पालकमंत्री, आमदार यांची नावे आहेत, परंतु कुणी आले नाहीत. जे गावच्या विकासाभिमुख कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत अशांना मी लोकप्रतिनिधी म्हणत नाही. या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण गेली बत्तीस वर्षे कार्यरत आहे. मात्र, सध्याच्या सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पाठ केल्याने जिल्हा विकासाच्या बाबतीत दहा वर्षे मागे गेला, अशी टीका राणे यांनी केली.