मडूरा गाव गेले चार दिवसांपासून अंधारात
सहाय्यक अभियंता यादव यांच्याविरोधात संताप
बांदा
मडूरा गावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांच्या निष्क्रियतेमुळे गेले चार दिवस वीज पुरवठा गायब आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण करून अद्यापही कोणती कार्यवाही करण्यात येत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप पसरला आहे. गेले आठ दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नळ पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. त्यामुळे वृद्ध महिलांसह नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. सहाय्यक अभियंता अनिल यादव यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे.
पहिल्याच अवकाळी पावसात महावितरणच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. उन्हाळ्यात वीज वाहिन्यांवरील झुडपांची सफाई न केल्याने मडूरा गाव अद्यापही अंधारात आहे. ठेकेदार व महावितरणचे अधिकारी यांची मिलीभगत असल्याने वीज खांबावर वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट असल्याने या समस्या वारंवार येत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
गेले आठ दिवस मडूरे गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. साहजिकच त्याचा विपरीत परिणाम नळ पाणीपुरवठा योजनेवर झाला आहे. आठ दिवस पाणी पुरवठा बंद असल्याने वृद्ध महिलांसह नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. स्थानिकांनी सहाय्यक अभियंता अनिल यादव यांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला. केवळ वीज बीले वसुलीसाठी ते तत्परता दाखवितात. काम मात्र शून्य असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अशा निष्क्रिय अधिकाऱ्याची बदली करावी अशी मागणी वीज ग्राहकांनी केली. याबाबत अनिल यादव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता.