शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करावी…
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे कणकवली प्रवासी संघाची मागणी..
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी व उपचार घेण्यासाठी येणार्या नागरिकांना योग्यरित्या अारोग्य सोसीसुविधांचा लाभ मिळत नाहीत. परिणामी त्यांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपण स्वतः लक्ष घालून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची मागणी कणकवली तालुका प्रवासी संघटनेने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर व कर्मचार्यांसह सोयीसुविधांची वानवा आहे. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये तपासणी अथवा उपचारासाठी येणार्या सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये चांगली आरोग्य सेवा मिळत नसल्याने सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील बुहतांशी लोकांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. त्यामुळे त्यांना आरोग्य सेवेचा लाभ शासकीय रुग्णालये त्यांच्यासाठी आधार आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होत असल्याने याठिकाणी आरोग्य सेवाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील खेडोपाड्यातील नागरिक येत असतात. मात्र, त्यांना संबंधित यंत्रेकडून डाॅक्टर व कर्मचारी नाहीत व सोयीसुविधा नसल्याचे कारण पुढे करून कोल्हापूर, मुंबई यासह अन्य महानगरांमधील रुग्णालयांमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. या सर्व गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार करून शासकीय रुग्णालयांमधील आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध करून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, अशी संघाने विनंती केली आहे.