*आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे- उमाजी केळुसकर*
चतुरस्र प्रतिभेचे, स्वाभिमानी पत्रकार म्हणून संपूर्ण रायगड जिल्हा त्यांना ओळखतो. अनेक सामाजिक समस्यांचा पाठपुरावा त्यांनी केला आहे. मी खोपोलीत रहात असताना माझ्या कविता कृषीवलच्या मोहोर पुरवणीसाठी पाठवत असे. ते या पुरवणीचे संपादक होते. त्या पुरवणीत माझ्या कवितांना प्रसिद्धी मिळे. कृषीवल रायगडचे मानपत्र म्हणावे असे दर्जेदार होते. संपूर्ण रायगडमध्ये त्यामु़ळे माझे नाव पोहोचले.
माझ्या पुण्यातील पत्रकार, संपादक मित्रांना (निलिमा शिकारखाने, स्व. कुमार ठाकोर, स्व. माधव चव्हाण) मी अलिबागला जेव्हा जेव्हा नेले, त्यांनी, त्यांच्या पत्नी सौ. योगिता वहिनी यांनी घरी उत्तम आदरातिथ्य केले.
आमच्या बँकेच्या स्टाफची दोन दिवसीय सहल आयोजित केली होती. राहण्याची जेवणाची व्यवस्था त्यांनी त्यांच्या जोशी या चौल येथील मित्राकरवी करविली. ऐन दिवाळीत हरीहर मीलन सोहळा सर्वांनी अनुभवला. बँक स्टाफला मध्यरात्री पूजा करण्यास मिळाली. तो सोहळा अपूर्व होता. माझ्या लेखनामुळे आम्ही जवळ आलो. निरपेक्ष, निर्लोभी मैत्री मी अनुभवली.
माझ्या दोन काव्यसंग्रह प्रकाशनासाठी ते सपत्नीक पुण्यात आले. उत्तम भाषणही केले. माझ्यासाठी आश्चर्याची आनंदाची बाब म्हणजे त्यांनी त्यांच्या कोकणनामा साप्ताहिकाचा पूर्ण विशेषांक माझ्यावर, माझ्या साहित्यावर प्रकाशित केला.
ते मूळचे पेझारी चे. माझ्या मोठ्या मुलाला अलिबाग ला मेडिकल कॉलेज ला अ़ॅडमिशन मिळाली होती. त्याच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था आम्ही पेझारी येथे केली होती. मा. उमाजी केळुसकर यांचे वडील आणि बंधू तिथे भेटले.
महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची छायाचित्र ते आवर्जून आपल्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ म्हणून वापरतात. त्यांच्या दिवाळी अंकासाठी मुद्दामहून माझ्या कविता ते मागवून घेतात. माझा हा सन्मान मला भारावून टाकतो.
त्यांच्याबद्दल बोलायचे तर महाराष्ट्रातील साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते आणि ज्यांनी रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे, अशा वरिष्ठ पत्रकार, साहित्यिक उमाजी केळुसकर यांनी ३७ वर्षे पत्रकारिता आणि साहित्यसेवा केली. २५ वर्षे दैनिक कृषीवलमध्ये सहसंपादक, त्यांनतर आता १२ वर्षे सा. कोकणनामा या साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांची पत्रकारिता चालू आहे.
त्यांची आकाशवाणीवर अभंग (१९८७), चमत्कार (१९८९) ही दोन नभोनाट्य सादर झाली आहेत. त्यांनी नाटकांत भूमिका केल्या. इतिहासा वाक माझ्या पुढे, सम्राट, कधीतरी ही ३ नाटके आणि शिकार (गूढकथा संग्रह), अंतर्दृष्टी (ऐतिहासिक कथा संग्रह), गोड पाण्याची विहीर(बालकथा संग्रह), रायगडचे रंगकर्मी (मुलाखत संग्रह), स्व. प्रभाकर पाटील यांचे चरित्र- कथा एका कर्तृत्वाची, दादाच्या गोष्टी- भाग १ ते ४ (बालकथा संग्रह), विहिरीतले भूत (बालकादंबरी), धैर्यवान धनंजय (बालकथा संग्रह), आकाशातील तारे (बालकथा संग्रह), गोड गोष्टी (बालकथा संग्रह), खोल खोल पाणी (रहस्यकथा संग्रह) , विरह (काव्यसंग्रह) इत्यादी १६ ग्रंथांची साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली. साहित्यिक म्हणून गूढकथा, ऐतिहासिक कथा, बालकथा, बालकादंबरी, कविता हे सर्व प्रकार त्यांनी हाताळले आहेत.
उमाजी केळुसकर यांची इतर वृत्तपत्रीय कारकीर्दही थक्क करायला लावणारी आहे. तसेच विश्वभरारी (५२ लेख), दादागिरी (१०० लेख), दादाच्या गोष्टी (१००० गोष्टी), भ्रमंती (५० लेख), ठसा आणि ठोसा (२० लेख), खारावारा (५६०० लेख), अग्रलेख (३२०० लेख), गूढयात्रा (१० गूढकथा), पुस्तकवेध (२०० लेख), झाडाझडती (५० लेख) आदी दैनंदिन आणि साप्ताहिक सदरे त्यांनी विविध वृत्तपत्रांत चालवली आहेत. तसेच दैनिक कृषीवलसाठी ‘धूमकेतू’ ही दैनंदिन चित्रकथा मालिकाही लिहिली. लोकसत्ता, नवल, हंस, किस्त्रीम, सामना, कथाश्री, किशोर, फुलबाग, कृषीवल, रामप्रहर आदी महाराष्ट्रातील, तसेच अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाच्या ‘सावली’ दिवाळी अंकांतूनही त्यांनी कथालेखन केले आहे. तसेच नवोदितांना आपल्यापरीने व्यासपीठ मिळवून देण्याचे त्यांनी काम केले आहे.
पत्रकारितेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा राजामाता जिजाऊ सर्वोत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार (१७ जानेवारी २०१६), रायगड प्रतिष्ठान, वावे चा रायगड गौरव पुरस्कार (१ फेब्रुवारी २०१८), नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार (२ मार्च २०१६), रायगड प्रेस क्लबचा काळकर्ते शि.म. परांजपे पत्रकारिता पुरस्कार (२४ मार्च २०१०), ऍड. दत्ता पाटील पत्रकारिता पुरस्कार (२७ आॅगस्ट २०१२), गुरुवर्य सुभानराव राणे पत्रकारिता पुरस्कार (१८ एप्रिल २०१४), पोयनाड गौरव पत्रकारिता पुरस्कार (५ मे २०१३), मॉर्निंग वॉक ग्रुप, आंबेपूर-पेझारीचा पत्रकार भूषण पुरस्कार (३ फेब्रुवारी २०२३), नागोठणे पत्रकार संघाचा नवीन सोष्टे साहित्यिक पुरस्कार (२७ मे २०२३), शिवनेरी सेवाभावी संस्था, हेमनगरचा शिवरत्न पुरस्कार (२०२४) साहित्यात रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा र.वा. दिघे कोकणस्तरीय साहित्य पुरस्कार (१९ जुलै २०१०), सह्याद्री साहित्य मंडळाचा गंगाधर पाटील साहित्य पुरस्कार (६ फेब्रुवारी २०१२), मराठा भूषण सन्मान (२५ जानेवारी २०१९), ४) सीतादेवी सोमाणी साहित्य पुरस्कार, बार्शी (३ फेब्रुवारी १९८९), मृत्युंजयकार साहित्य पुरस्कार, नागपूर (४ जानेवारी १९९०) मुंबई वृत्तपत्र लेखक साहित्य पुरस्कार, मुंबई (८ एप्रिल १९९१) रुक्मीणीदेवी राज्य साहित्य पुरस्कार, पंढरपूर (६ एप्रिल १९९२), ठाणे वृत्तपत्र लेखक संघ साहित्य पुरस्कार (८ जानेवारी १९९३), इंडियन आर्ट कल्चर साहित्य पुरस्कार, कल्याण (३ जानेवारी १९९७) आणि इतरही अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
निळू फुले, बाबा कदम, शिवाजी सावंत, द.मा. मिरासदार, ह.मो. मराठे, दिनकर गांगल, प्रवीण दवणे, वसंत जोशी अशा दिग्गजांकडून त्यांचा गौरव झाला आहे.
रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून, तसेच अलिबाग तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. स्व. भ.ल. पाटील साहित्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी कार्यरत असून त्यांनी २०१८ च्या दुसर्या समुद्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
त्यांची रामदास बोट दुर्घटनेवर ‘…आणि रामदास बोट बुडाली!’ ही थरारक कादंबरी लवकरच प्रसिद्ध होणार आहे.त्यासाठी त्यांना शुभेच्छा!
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567568