तृतीयपंथीय फॅशन शो स्पर्धेत सिंधुदुर्गाच्या रिया आळवेकर ठरल्या विजेत्या
कोल्हापूर येथे पार पडली राष्ट्रीय स्तरावरील फॅशन शो स्पर्धा
सिंधुनगरी
कोल्हापूर येथे तृतीय पंथीयासाठी पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील फॅशन शो स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आळवेकर विजेत्या ठरल्या आहेत. आळवेकर ह्या देशातील पहिल्या तृतीय पंथी शिक्षिका असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस येथील प्रथमिक शाळेवर कार्यरत आहेत. शाळांमधील शैक्षणिक उपक्रमात वा शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. आता राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमध्ये त्या विजेत्या ठरल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग व मैत्री फौंडेशन कोल्हापूर आयोजित तृतीय पंथीयांचा रॅम्प वॉक फॉर इक्वालिटी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. हा फॅशन शो पारंपरिक ट्रेडिशनल राऊंड, फ्री लान्स राऊंड व टॅलेंट राऊंड अशा तीन प्रकारांमध्ये घेण्यात आली. यात महाराष्ट्र अन्य राज्यातील १६ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक रिया मयुरी आळवेकर ( सिंधुदुर्ग), द्वितीय क्रमांक दीपा नाईक (मिरज), तर तृतीय क्रमांक दक्षता पाटील (पुणे) विजेते ठरले.
परीक्षक म्हणून सायबर महिला महाविद्यालयाच्या फॅशन विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. ज्योती हिरेमठ, व प्रा. प्रज्ञा कापडी तर कोल्हापूर येथील डॉ. वैदेही पोटे यांनी कामकाज पाहिले. तर गिरीश कर्णावत व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मनिषा संकपाळ, डॉ. सोनिया राजपुत समाजकार्य विभाग प्रमुख सायबर यांचे स्पर्धेला विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सुरवात भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेच्या वाचनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक भोसले यांनी केले. यावेळी मैत्री फौंडेशनच्या मयुरी आळवेकर, संग्राम संस्थेच्या माया गुरव यानी मनोगत व्यक्त केले. आभार विद्यार्थी प्रतिनिधी स्मिता कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन रितेश कांबळे व राधिका बुरांडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लबचे आकाश बिरंजे यानी केले मोहन तायडे, नेहा सूर्यवंशी, पूर्वा सावंत, डॉ. सुरेश आपटे, अँड. डॉ. अश्विनी उपस्थित होते.