वैभववाडी
घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीबाबत ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच ग्रा. पं. कडून दिल्या जाणाऱ्या वसुलीच्या पावती गहाळ होण्याचे प्रकार होत असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी तालुक्यातील अरुळे ग्रामपंचायतीने ‘पासबुक संकल्पना’ अमंलात आणली आहे. संकल्पना राबवणारी अरुळे ग्रामपंचायत तालुक्यात पहिली तर जिल्ह्यात दुसरी आहे. या संकल्पनेमुळे व्यवहारात पारदर्शकता येऊन लोकाभिमुख करता येणार आहे. या संकल्पनेचे जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतीनी अनुकरण करावे असे आवाहन जि. प. समाजकल्याण सभापती शारदा कांबळे यांनी केले.
अरुळे ग्रामस्थांच्या घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीतील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी ग्रामपंचायतीने पासबुक संकल्पना आणली आहे. या पासबुकांचे वितरण समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष नासिर काझी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच उज्वल नारकर, उपसरपंच सुहास जांभळे, मौजे अरुळे ग्रामविकास मंडळ मुंबईचे सचिव समाधान माईणकर, मंडळाचे स्थानिक कमिटी अध्यक्ष अनिल खांबल, ग्रामसेवक प्रशांत जाधव,सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीबाबत ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामपंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या वसुलीच्या पावत्या गहाळ होण्याचे प्रकार होत असल्याने ग्रामस्थांना त्याचा नाहक त्रास होत होता. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने पासबुक वितरणाची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.या संकल्पनेमुळे भविष्यात ग्रामपंचायतीच्या व्यवहारात पारदर्शकता येणार असून ग्रामस्थांना घर बसल्या ग्रामपंचायतीतील सर्व व्यवहारांची माहिती मिळणार आहे.अरुळे ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना सभापती कांबळे म्हणाल्या की, ग्रामपंचायतीचा व्यवहार प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत कसा पोहोचवावा यासाठीची ग्रामपंचायतीची ही संकल्पना वाखाणण्याजोगी आहे. आपण निवडून दिलेला सरपंच ग्रामस्थांचा विचार करणारा असेल तर काय होऊ शकते याचा नमुना येथे पाहायला मिळाला. या संकल्पनेमुळे व्यवहारात पारदर्शकता येऊन लोकाभिमुख कारभार करता येणार आहे. अरुळे ग्रापंचायतीच्या या संकल्पनेचे जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींनी अनुकरण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना नासिर काझी यांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सरपंच जागृत असेल तर विकास दूर नसतो. अरुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. ग्रामपंचायतीची ही संकल्पना आम्ही तालुक्यात राबविणार आहोत. यावेळी काझी यांनी अरुळे गावासाठी महत्वाची कामे या मार्च पूर्वी करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीची ही घोडदौड सुरू आहे. ही घोडदौड अशीच सुरू राहणार आहे. विकास कामे करून देण्याची धमक आमदार नितेश राणे यांच्यामध्ये आहे त्यामुळे अरुळे ग्रामपंचायतीला भविष्यात निधी कमी पडू देणार नाही. असे आश्वासन त्यांनी दिले.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचा ग्रामस्थांना लाभ होणार आहे. या उपक्रमाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पासबुक संकल्पना आणि त्याला आलेले मूर्त स्वरूप हा गाव विकासातील महत्वाचा टप्पा असणार आहे.
प्रास्ताविक सरपंच उज्वल नारकर यांनी केले. तर उपसरपंच सुहास जांभळे यांनी आभार मानले. सूत्र संचालन ग्रामसेवक प्रशांत जाधव यांनी केले.