You are currently viewing प्रिय पालक……. शिक्षकाने लिहिले पालकांना पत्र.

प्रिय पालक……. शिक्षकाने लिहिले पालकांना पत्र.

प्रिय पालक……. शिक्षकाने लिहिले पालकांना पत्र.

वर्षभर पालक शिक्षकांकडून अपेक्षा ठेवत असतात. त्याच प्रमाणे उन्हाळी सुट्टीत मुले घरी असल्याने श्री. सुनील करडे गुरुजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलगाव नं ४ सावंतवाडी यांनी पालकांना पत्र लिहून आपली अपेक्षा व्यक्त केली.

प्रिय पालक नमस्कार

या शैक्षणिक वर्षात माझ्या शाळेने बऱ्याच गोष्टी तुमच्या सहकार्यातून साध्य केल्या. सरस्वती देवी पूजन च्या वेळी आपल्याकडून झालेला उठाव खूप छान होता. तसेच मुलांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये बसवण्याची विनंती केल्यानंतर आपण सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि त्याचं फळ म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या शाळेचा लागलेला शंभर टक्के निकाल. तसेच मुलांनी पाच मेडल आपल्या शाळेला मिळवून दिली.
इतर संस्थांकडून काही स्पर्धा आयोजित केल्या असताना त्या स्पर्धेत माझ्या मुलांनी सहभाग घेऊन तिथे ती देखील चमकदार कामगिरी केली आणि यश संपादन केले. तसेच तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत च्या सहकार्यातून व शैक्षणिक उठाव मधून शाळेला पाण्याची सोय करून दिलात. श्री संतोषजी राऊळ यांच्या माध्यमातून शाळेला लॅपटॉप मिळाला व आपली शाळा डिजिटल झाली. आणि विशेष सांगायचं झालं तर तुमच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने आपली शाळा नवोपक्रम स्पर्धेत राज्यापर्यंत पोहोचली. हे सर्व यश हे तुम्हा सर्वांच्या माध्यमातून आणि सहकार्यातून मिळालेले आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
आता थोडं महत्त्वाच्या विषयावरती मला तुमच्याशी बोलायचं आहे. काही दिवसांपूर्वी माझे मार्गदर्शक मित्र आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळ करण्याचा मानस असणारे माझे मित्र श्री रामचंद्र आंगणे साहेब भेटले होते. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या व त्याबद्दल मला तुम्हा सर्वांसोबत चर्चा करावीशी वाटली म्हणून हे पत्र आपणास लिहीत आहे.
1. मुलांना घरी जे शिजेल तेच अन्न खाऊ द्या बाजारातून आणलेलं फास्ट फूड नकोच.
2. मुलांना स्वयंपाक घरातील छोटी मोठी काम करायची सवय लावा. त्यांना स्वतःच ताट स्वतःच घासायला सांगा.
3. त्यांना मोबाईल देऊ नका. मुलं मोठी झाली की त्यांना मोबाईल घ्यायची संधी मिळणारच आहे आणि ती आयुष्यभर मोबाईल वापरणारच आहे. त्यामुळे आता दीड महिन्यात त्यांना मोबाईल देऊच नका.
4. त्यांना बागेत जाऊ द्या. मैदानात पारंपारिक खेळ खेळू द्या. गरज पडल्यास त्यांच्यासोबत तुम्ही देखील थोडं खेळून पहा.
5. कोकणातील निसर्गातून मिळणारा कोकणी मेवा विद्यार्थ्यांना मनसोक्त चाखायला द्या. आपल्या परिसरात सहज उपलब्ध होणारी आंबा, काजू, करवंद ,जांभळ …..ही फळे खायला द्या.
6. दिवसातून टीव्हीवरील किमान एक बातमीपत्र बघायला द्या. वर्तमानपत्र येत असेल तर वर्तमानपत्र वाचायला द्या.
7. परिसरात, घरात उपलब्ध असणारी जुनी नवी पुस्तके वाचायचा आग्रह धरा.
8. टीव्ही पासून मुलांना परावृत्त करू शकत नाही परंतु लहान मुलांसाठी असलेल्या चॅनलवरील एखादी सिरीयल बघायला द्यायला हरकत नाही.
9. दररोज किमान एक कथा वाचायला लावा किंवा ती कथा तुम्हाला थोडक्यात सांगायला लावा. म्हणजे तुमच्या गप्पा मारण्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतील असा प्रयत्न करा.
10. शाळेला सुट्टी असली तरी आपली मुलं किमान दहा वाक्य प्रतिदिन लेखन करतील यासाठी प्रयत्न करा. त्यामध्ये अनुलेखन असेल किंवा स्वतःच्या मनाची 10 वाक्य असतील किंवा एखाद्या विषयावरील मुलाला वाटणारे मत 10 वाक्यातील असेल. काहीही लिहिले तरी त्याचा स्वीकार करा. तुम्हाला काही अजून ऍड करता आलं तर जरूर करा. म्हणजे सुट्टीत मुले लेखन कौशल्य विसरून जाणार नाहीत आणि हाताचं वळण चांगलं राहील.
11. तशा आदर्श पालक म्हणून करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. मी काही गोष्टींची आठवण करून दिली आहे. तुमच्या पाल्यासाठी जे जे चांगलं करता येण शक्य आहे व सहज करता येण शक्य आहे ते ते करा….

साडेदहा महिने मी माझी मुलं सांभाळली आणि आता दीड महिन्यासाठी माझी मुलं तुमच्याकडे देत आहे.
मला खात्री आहे की गेले वर्षभर मी जे संस्कार करण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या सवयी मुलांना लावल्या त्या सवयी बदलणार नाहीत .ज्या चांगल्या आहेत त्या तशाच राहतील आणि त्यामध्ये अजून वाढ होईल, यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. त्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण अशी कोणती गोष्ट मुलांना करायला देऊ नका की जी मुलांना हानिकारक ठरेल. लहानपणी लावलेल चांगले वळण हे आयुष्य चांगल्या वळणावर घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडते. त्यासाठी तुम्ही आणि मी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. मुलांशी चांगल्या गप्पा मारा. मुलांना बोलायची, त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी द्या. योग्य आणि चांगली कामे करायला द्या. त्याचा आउटपुट आपल्याला सगळ्यांना नक्की मिळेल आणि मुलांचं भविष्य उज्वल घडेल. अशी मला खात्री आहे. यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य उपलब्ध होईल अशी आशा बाळगतो.
मे महिन्याच्या सुट्टीसाठी मुलांबरोबरच तुम्हालाही शुभेच्छा 💐💐💐
पुन्हा पंधरा जूनला आपण नव्या उत्साहाने नव्या जोमाने भेटणार आहोतच. पण तुम्हाला किंवा मुलांना माझी काही कारणाने आठवण आली तर मी ऑनलाईन फोनवर उपलब्ध आहे .आपण जरूर संपर्क साधू शकता. आणि हो तुमच्या पाल्याने सुट्टीमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट केली असेल तर त्याचा फोटो मला शेअर करू शकता. अर्थात तुम्हाला शक्य असल्यास….
धन्यवाद

आपला व आपल्या पाल्याचा मित्र ,
सुनील करडे
संपर्क क्रमांक 848003399

प्रतिक्रिया व्यक्त करा