You are currently viewing स्मृति भाग ७१

स्मृति भाग ७१

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति भाग ७१*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज पण *गौतम स्मृति* मधील अध्याय चार मधील विवाह वर्णन पाहू .
असमान प्रवर ज्यांचे आहेत , त्यांच्यातच विवाह सम्पन्न होवू शकतो . ब्राह्मणेतर समाजांमधे आजसुद्धा कुलविचार केल्याशिवाय लग्न ठरत नाहीत वा होत नाहीत !! हे ऋषिकष्टाचे फळच आहे . वडील आणि त्याच्या बांधवांपैकी सात पिढ्यांचे पलिकडील व आईकडील बांधवांचे पाच पिढ्यांपलिकडील वरवधू असावेत !! आजकाल ब्राह्मणांमधेही मावशीच्या मुलीशी लग्नाची उदाहरणे सापडू शकतात , इतका ब्राह्मणच पतीत झाला आहे !!!
विवाहाचे आठ प्रकार ऋषिंनी सांगून ठेवले आहेत . १)ब्राह्मविवाह , २)प्राजापत्यविवाह , ३)आर्षविवाह , ४)दैवविवाह , ५)गान्धर्वविवाह , ६)आसुरविवाह , ७)राक्षसविवाह , ८)पैशाचविवाह . यांच्या, व्याख्या मी न देण्याचे कारण कृपया आपण एखादी तरी स्मृति उघडून पहावी , हे आहे . यातील प्रथम चार विवाह हे धर्मयुक्त आहेत , तर काहींचे मताने पहिले सहा धर्मयुक्त आहेत . आजकाल जेंव्हा नवरदेव नवरीसह मंडपात येतो , माझ्या वाचनात तो राक्षसविवाह ठरावा !!
काहीवेळा विवाह हे अनुलोम प्रवाहाने होतात , तर काहीवेळा प्रतिलोम पद्धतीने . त्या त्या वर्णाव्यतिरिक्त विवाह झाल्यास त्यांचे नामकरण या चार ही वर्णांपेक्षा वेगळे होते . त्यांचे काम व त्यांच्या मर्यादा ही त्या काळी ठरलेल्या होत्या . त्यातील एक मत मी आपणापुढे मांडत आहे .
काहींचे मताने ब्राह्मणीचा आनुपूर्व्य क्रमाने ब्राह्मण—क्षत्रिय—वैश्य वा शूद्र वर्णाशी विवाह झाल्यास त्यांचेपासून होणारा पुत्र क्रमाने ब्राह्मण—सूत—मागध—चाण्डाल असतो . क्षत्राणीचा विवाह आनुपूर्व्य क्रमाने झाल्यास जन्मणारा पुत्र मूर्धावसिक्त—क्षत्रिय—धीवर—पुक्कस संबोधला जातो . वैश्यवर्णी मुलीचा विवाह अशा क्रमाने झाल्यास येणारा पुत्र भुज्जकण्ठक—माहिष्य—वैश्य—वैदेह ठरतो . शूद्रेचा या क्रमाने येणारा पुत्र पारशव—यवन—करण—शूद्र असा गणला जातो . इतर मतांसाठी स्मृति वाचाव्या , असे माझे मत आहे .
जे प्रतिलोम विवाह पद्धतीने जन्माला येतात ते पुढे धर्माने हीन होतात , हे स्पष्ट आचार्य मत आहे . याचा विचार भारतीय न्यायालये , सांसदभवन वा सामाजिक विचारवंतांनी नाही करायचा तर कुणी करायचा ? अन्यथा माझ्या भारतमातेला भ्रष्ट करण्यासाठी तिचीच संताने पराकोटीचा प्रयत्न करतांना दिसतात !!!! अशावेळी जर न्याय , नीतिने वा राज्यव्यवस्थेने साथ सोडली तर धर्माने वागणारांचे किती हाल होतील ? ( कारण जे धर्मनिरपेक्षतेचा आतंक सगळीकडे पसरवतात , तेच कट्टर धार्मिक असतात , असे व्यवहारात आढळून येते ! ) मग ज्या देशात स्मृतिंचे निर्माण झाले नाही , त्या देशांमधील मुक्त संस्कृती भारतात नांदली तर चालेल का ? मग तर पशुताच नांदेल पृथ्वीतलावर !!!!! विचारवंतांनी विचार केला नाही तर ते ही पशूच ठरावेत !!!!!!!
आर्ष विवाहाने निर्माण होणारी संतान आपल्या तीन पिढ्यास पवित्र करते . दैवी व प्राजापत्य विवाहाने उत्पन्न पुत्र दहा पिढ्यास पवित्र करतो . ब्राह्म विवाहाने उत्पन पुत्र मागील व पुढील दहा दहा पिढ्यास पवित्र करतो .
करा विचार लग्न कसे वा कुणाशी ठरावे त्याचा !! सुंदर आहेत ना स्मृति ? तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ?

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०

प्रतिक्रिया व्यक्त करा