तालुकानिहाय वितरण सुरु, समग्र शिक्षा अंतर्गत योजना
पहिल्याच दिवशी शाळेत मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
सिंधुदुर्गनगरी
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेतच पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना ही मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्याकरिता तालुकानिहाय पाठ्यपुस्तकांचे वितरण बुधवारपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी दिली.
पहिली ते आठवीतील कोणताही विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित राहू नये, त्याला पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडचण येऊ नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती राहावी. गळतीचे प्रमाण शून्यावर यावे, यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या पुस्तकांचे तालुकानिहाय वितरण आजपासून विभागीय पाठ्यपुस्तके भांडार शिरोली येथून सुरु करण्यात आले.
तालुका व पाठ्यपुस्तक संच संख्या पुढीलप्रमाणे सावंतवाडी- 11 हजार 16, मालवण- 6 हजार 169, कणकवली- 10 हजार 323, कुडाळ-11 हजार 797, देवगड-8हजार 830, वेंगुर्ले-4 हजार 988, वैभववाडी- 3 हजार 4, दोडामार्ग 2 हजार 597 अशी एकूण 58 हजार 724 पाठ्यपुस्तक संचाची संख्या आहे.
यावेळी बालभारतीचे सहाय्यक व्यवस्थापक, किशोर पाटील, व सहा. सचिन जाधव, समग्र शिक्षा कार्यक्रमाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे, हेमांगी जोशी, विषयतज्ञ, कुडाळ, शिवशंकर तेली, विशेष शिक्षक, सावंतवाडी, प्रदिप तांबे, विषयतज्ञ, कणकवली, नितीन पाटील विशेष शिक्षक, मालवण असे तालुक्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.