सावंतवाडी शहरावर वॉच ठेवणारी सर्वच “सीसीटिव्ही” यंत्रणा बंद…
तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करा, नागरिकांची मागणी….
सावंंतवाडी
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच शहरातील घडामोडींवर वॉच ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडुन लावण्यात आलेले एक-दोन नव्हे तर सर्वच सीसीटिव्ही बंदावस्थेत आहेत. संबंधित सेवा पुरविणार्या कंपनीचे कंत्राट संपल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. याबाबत वारंवार वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतू अद्याप पर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही, असे सांगुन पोलिस अधिकारी व कर्मचार्यांकडुन अधिक बोलण्यास नकार देण्यात येत आहे. मात्र हे कॅमेरे तात्काळ सुरू करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सावंतवाडी शहरात तब्बल ३५ हून अधिक ठिकाणी पोलिस प्रशासनाकडून कॅमेरे बसविण्यात आले होते. त्या ठिकाणी घडणार्या घडामोडींवर लक्ष ठेवणे सोईचे व्हावे यासाठी हे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यात मोक्याच्या ठिकाणांसह शहरातील तिठ्याचा समावेश आहे. दरम्यान काही दिवसांपुर्वी यातील काही कॅमेरे बंद होते. याबाबतचे वृत्त समजल्यानंतर ब्रेकिंग मालवणीच्या माध्यमातून वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानंतर हे कॅमेरे पुन्हा सुरू करण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. याबाबत कर्मचार्यांना विचारले असता त्या संबंधित सेवा पुरविणार्या कंपनीचे कंत्राट संपल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयाला याबाबतची माहिती दिली. परंतू तेथून अद्याप पर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत अधिक माहितीसाठी सावंतवाडी पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होवू शकला नाही.