You are currently viewing मन पाखरा रे!

मन पाखरा रे!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

 

*मन पाखरा रे!*

 

मी स्वतःला स्थितप्रज्ञ मानत नाही पण माझी बुद्धी स्थिर आहे असे मला वाटते. मी चंचल नाही. मी प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करते आणि निर्णय घेते. माझ्या आजूबाजूला एक मोठा जनसमुदाय असतो, त्यांच्यात होणारे संवाद मी ऐकते पण त्याचा माझ्या मनावर नेहमीच परिणाम होतो असे नाही. खूप वेळा तर मी ऐकते आणि सोडून देते शेवटी मला जे वाटते तेच मी करते.

लोक मला म्हणतात,

“ तू हट्टी आहेस.”

“आहे मी हट्टी!”

लोक मला ‘शिष्ट’ म्हणतात.

“ हो! आहे मी शिष्ट!”

 

पण त्या दिवशी एक अगदी लहानशी घटना घडली. मला माझ्या नवऱ्याने एक चॉकलेट दिलं. मी चॉकलेटचा रॅपर उघडून चॉकलेट मोकळं केलं आणि खाऊनही टाकलं. सवयीप्रमाणे रॅपर ट्रॅश मध्ये टाकायला उठले आणि त्यावरच्या अक्षरांवर सहज नजर गेली. रॅपर थोडासाच *चुरगळला* होता. तो पुन्हा नीट उघडला. त्यावर लिहिले होते,

“ तुझा तुझ्याविषयीचा गैरसमज दूर कर. तू घातलेला हा गंभीर मुखवटा फाडून टाक आणि त्यात तडफडणाऱ्या मनाच्या पाखराला मुक्त कर.”

खरं म्हणजे एक बाजारी कागद! त्यावर लिहिलेल्या शब्दांना काय महत्त्व द्यायचे? कोणीही काहीही लिहावं. अखेर एक गंमतच ना? त्याचे काय एवढे? पुन्हा एकदा मी तो कागद *चुरगळला* आणि केराच्या टोपलीत फेकूनही दिला.

 

पण नाही हो! हे प्रकरण एवढ्यावर नाही मिटलं. मनात कोंडलेलं एक पाखरू फडफडत राहिलं. मनाचा गाभारा चोचीनं टोकरत राहिलं. वेदना जाणवायला लागली, जखम भळभळायला लागली. मन पाखरू बनलं. मुक्ततेसाठी धडपडू लागलं आणि उगीचच वाटू लागलं,

“मी खरी का खोटी?”

“मी स्थिर की अस्थिर?”

“ मी सुखी का दुःखी?”

“ मी मुक्त की बंधनात?”

“ कोणतं माझं आकाश? फक्त डोक्यावरचं की दूरवरच्या त्या डोंगरावरचंही?”

मिटल्या कमळात एखादा भुंगा तडफडावा ना तसा हा मनाचा भ्रमर आतमध्ये नि:शब्द कोंडल्यासारखा जाणवू लागला. पार नदीच्या उगमापासून ते पावलापाशी थांबलेल्या पाण्यापर्यंत विचार वाहू लागले. मनात कोंडलेलं एक पाखरू आकाशाचा वेध घेत उंच उंच उडायला लागलं. माझं मनच पाखरू झालं. कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर, इकडून तिकडे— तिकडून इकडे. कधी जमिनीवर, कधी पंख भिरभिरत आभाळी आणि मनाच्या या पाखराला मी जेव्हा पंख पसरून उडताना पाहिलं ना तेव्हा माझ्यातली मी, खरी, खोटी, हरवलेली दिसू लागले. माझंच मन मी पाहू लागले.

 

वारंवार झालेले मनावरचे घाव गोंजारत राहिले. मनावर झालेल्या ओरखड्यांच्या खुणा मी तपासू लागले. मन माझं हसलं, रुसलं, भांबावलं, आक्रंदलं आणि पुन्हा पुन्हा पिंजऱ्यात कोंडलं गेलं.

“ हा रंग तुला शोभत नाही.”

नाही घातला.

“ हे तुला जमणार नाही.”

नाही केलं.

“अंथरूण पाहूनच पाय पसर.” तेच केलं. “मुलीने मुलीसारखे रहावे, वागावे.” म्हणजे नेमकं काय पण नाही विचारले प्रश्न.

आता वाटतं मन माझं स्थिर असणं, चंचल नसणं म्हणजे चौकटीत राहणं होतं का?

आयुष्याचे अनेक कप्पे झाले. ते नीटनेटके रचताना खूप दमछाक झाली. स्वतःपेक्षा इतरांचाच विचार केला. याला काय वाटेल त्याला काय वाटेल यातच बरीचशी ऊर्जा कामी आली. मनातल्या पाखराने बंद दारावर अनेकदा थाप मारली पण दार उघडून त्या बंद पाखराला मोकळं करण्याचं बळ म्हणण्यापेक्षा धाडस झालं नाही. भय कधी संपलं नाही. एक कोष विणला आणि त्यातच स्वतःला गुंतवून ठेवलं. शिवाय मला जे योग्य वाटलं ते मी केलं या समाधानातही राहिले. प्रवाहच पकडून ठेवला. कधी कुणाविषयी हेवादावा, द्वेष, मत्सर वाटलाच नाही असं नाही. एका सरळ रेषेत आयुष्य जगत असताना रेषेबाहेरचं आपलं सामर्थ्य, आपलं भविष्य तपासून पहावं, सारे बंध तोडावेत, पूजलेले उंबरठे हटवावेत असं वाटलंच नाही का?

*तुज अडवितो कैसा उंबरा*

*आकाशी झेप घे रे पाखरा*

*सोडी सोन्याचा पिंजरा ..*

हे स्वर तसे नेहमी गाभाऱ्यात घुमले. नाही सोडला पिंजरा. कम्फर्ट झोन होता तो आपला. तो सोडून जाण्याचं प्रचंड भय होतं मनात आणि म्हणून असेल कदाचित तक्रार नव्हती आयुष्याबद्दल. जे आहे ते चांगलं आणि तेच आपलं यात सुखाने सारं काही चाललं होतं.

 

मग इतक्या वर्षानंतर जवळजवळ आयुष्याचा उत्तरार्धही संपत असताना एका चॉकलेटला गुंडाळलेल्या कागदावरच्या अक्षरांनी इतकी मोठी क्रांती करावी मनात की सुप्तावस्थेत असलेल्या क्रांतीच्या बीजाला एकदम मोड यावेत? विरुद्ध प्रवाहात झेप घ्यावी असे वाटावे? खरं म्हणजे कुठला प्रवाह? मनाचा की समाजाचा? आयुष्यभर विरुद्ध प्रवाहातच हातपाय मारले की पण तो होता मनाचा प्रवाह.

 

आता आत अंतरात फडफडणारं एक पाखरू उडू उडू पाहतंय.. मनाच्याच प्रवाहात जाण्याचं आव्हान करतंय.

“ बा पाखरा! आता उशीर झाला रे! कुठे उडशील? कुठे झेप घेशील? पंखातली ताकद संपली रे! आणि कितीही भरारी मारलीस ना तरी मुक्त कसा होशील? उगीच भटकंती होईल. घरट्याची आठवण येईल.मळलेल्या वाटेवरून चालणारे आपण. म्हणून सांगते,

“या चिमण्यांनो! परत फिरा रे

घराकडे आपल्या

जाहल्या तिन्ही सांजा…”

 

खलील जिब्रान म्हणतो,

THE RIVER NEEDS TO ENTER THE OCEAN,

 

नदीचा शेवट सागरातच.

म्हणून विनविते,

“ मनाच्या पाखरा पुरे झाले उडणे. आवर पंख. घरट्यात ये.

 

राधिका भांडारकर पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा