*जागतिक साहित्यकला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री सौ. मृणाल गिते लिखित अप्रतिम गझल*
*काजळमाया*
गर्भामधल्या बाळासाठी जन्म नव्याने जगते आई
मरण यातना जगतानाही अंतरातुनी हसते आई
नाळ जोडली जन्माची या मातृत्वाच्या ममतेपाशी
जिवतीचे मग पूजन करुनी काजळमाया करते आई
दुःख मुलांना होते तेव्हा काळजातून तुटते आई
समईमधल्या ज्योतिसारखी कर्तव्याने जळते आई
राब राबते जीव तोडते सर्वांसाठी लढते आई
संकटकाळी धावत येते ,पदर स्वतःचा धरते आई
माहेराची सय होते अन् सासरघरी लक्ष्मी वसते
दोन घरांचा दुवा सांधते उंबरठ्यावर दिसते आई
चारी चौकस नाती गोती जपता जपता थकून जाते
जोडत असते तुटले फुटले घर श्र्वासाने जपते आई
चालविण्या हे जग देवा का निर्मिलेस तू आईला
तुझीच छाया तिच्या रूपाने, मनात माझ्या असते आई
सौ मृणाल गिते
नाशिक