*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*
*अक्षय्य तृतीया ! अक्षय्य आनंद देणारा सण!*
वैशाख शुद्ध महिन्याची तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया,! तशी तर प्रत्येक मराठी महिन्यात शुक्ल..शुद्ध पंधरवाड्यात शुद्ध तृतीया येतच असते.पण हिंदु संस्कृतीत अति महत्वाची तिथी..सण म्हणजे अक्षय्य तृतीया! ज्याचा कधीही क्षय होत नाही असा हा अक्षय्य सणदिवस!
या सणाचे महत्त्व काय सांगावे! या दिवशी केलेले सत्कर्म..दानधर्म..यज्ञयाग…पूजापाठ.. नी मिळणारे पुण्य हे अक्षय रहाते त्याचा कधीही क्षय होत नाही.
हिंदु संस्कृतीत जे साडेतीन मुहूर्त आपण मानतो. त्यांत एक पूर्ण मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया! शुभ कार्याची सुरुवात..नवीन वस्तू खरेदी..सोनंनाणं खरेदी…जे काही आपण खरेदी करू त्याचा क्षयहोत नाही ते टिकून रहाते. म्हणून यांचे महत्त्व आहे.
अक्षय्य तृतीयेला त्रेता युगाचा प्रारंभ झाला. विष्णूचा सहावा अवतार,जमदग्नि ऋषी नि रेणुकामातेचा पुत्र पराक्रमी परशुरामाचे अवतरण याच शुभ दिनी झाले परशुराम चिरंजीव आहेत. .नरनारायण प्रगटीकरण..हयग्रीव..अवतरण याच तिथीला झाले असल्याने अक्षय तृतीयेचे विशेष महत्व आहे.
अक्षय तृतीया ही तिथी म्हणजे दानधर्मासाठी पर्वणी आहे. उन्हाळा या दिवसांत चांगलाच तापतो. म्हणून जलदानाचे विशेष महत्व आहे. जलकुंभाचे दान ब्राह्मणाला देतात. किंवा तहानलेल्याला पाणी देणे..त्याची तृषा भागविणै..शांत करणे हे एक सत्कर्मच नाही का!
सत्तूधान्याचे. दान करतात. सत्तूपिठ थंड असते. आंबा या महिन्यात मुबलक मिळतो. आंबा फळ.देतात.खरबूज..टरबूज यात पाण्याचे प्रमाण जास्त असते म्हणून ते दान करतात. तप्त उन्हाच्या झळांपासून बचाव व्हावा हा थंड वस्तू देण्यामागे हेतू असतो.. ऋतुचक्राला अनसुरून हे सण साजरै करण्यात आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी निश्चितच दिसून येते.
या दिवशी ब्रह्मांडात सत्व रज लहरींचा प्रभाव जास्त असतो. त्यांची गतीही एकसमान असते.या लहरींच्या प्रवाहायोगे पितर नी देव यांना उद्देशून केलेले दान पुण्यदायी असते.कारण या कधीही क्षय न होणा-या लहरींच्या प्रभावात केलेले दान हे अक्षय रहाते नी पुण्य फलदायी ठरते.म्हणूनच सत्कर्मांची नांदी करण्याचा हा शुभ दिवस! अक्षय्य तृतीया!
या दिवशी लक्ष्मीची प्रार्थना विष्णू पूजन करतात. त्यायोगे सुख.. समृद्धी तीत वाढ होते. या दिवशी केलेल्या कामात यश मिळते असेही मानले जाते.
पितरांचे श्राद्ध.. तर्पण..भोजन या दिवशी केल्याने पितरांना शांती मिळते. व-हाडांत तर हा दिवस श्राद्धासाठी विशेष मानला जातो. मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो निंब फुलांचे विशेष महत्व मानतात. भोजनांत चिंचवणी करतात. नी भोजन दिले जाते. पितरांची सर्व प्रकारे शांती केली जाते.
शुभ मुहूर्त असल्याने गृहखरेदी..गृहप्रवेश..वाहन खरेदी.. मौल्यवान वस्तू खरेदी करून आनंद द्विगुणित केला जातो.
चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीये पर्यंत महाराष्ट्रात चैत्र गौर मांडली जातै शक्तीची पूजा होते. . गौर माहेराला आलेली असते. या सोहळ्याचा समापन दिनही अक्षय तृतीयेलाच असतो. गौरीचे पूजन अर्चन महिनाभर करून तिची सासरला पाठवणी करण्याचा हा दिवस! स्त्रिया चैत्र गौरीचे हळदीकुंकू करतात .आंब्याची डाळ ..पन्हे..देतात. ओले हरभरे ओटीत देतात. चार सुखदुःखाच्या गोष्टी करून मन हलके.. ताजेतवाने केले जाते. एकप्रकारे स्त्रियांकडून आनंद दानच होते की!
आधुनिक काळाचा विचार करता. हवेचं प्रदूषण सध्या चरम सिमेवर आहे. तेव्हा कडुनिंब…पिंपळ..वडाची रोपे दानात द्यायला सुरुवात करायला हवी. ही झाडे प्राणवायूचा उत्तम स्त्रोत आहेत…शिवाय पाणी जिरवण्याची नी टिकविण्याची त्यांची क्षमताही खुप जास्त आहे. पर्यावरण रक्षणासाठी अशी रोपे दान केलीत तर पुढील पिढ्यांसाठी हे महत्वाचे सत्कर्म ठरेल. तेव्हा या शुभ मुहूर्तावर हे शुभ कार्य करायला निश्चित सुरुवात करू या. जेणे करून
शुद्ध हवा..शुद्ध पाणी सर्वांनाच अक्षय मिळेल..त्यायोगे. सुख संपन्नता शांतीही अक्षयच लाभेल.
असै या सणाचे महत्त्व जाणून काळानुसार सत्कर्माची नांदी करायला काय हरकत आहे? या शुभ मुहूर्तावर, मग शुभस्य शिघ्रम् ! हो न!
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.