खोदाईमुळे दुर्दशा झालेल्या तारकर्ली रस्त्याची डागडुजी व्हावी ; अन्यथा आमरण उपोषणास बसणार सुरेश बापर्डेकर यांचा इशारा
मालवण
नौदल दिन कार्यक्रमावेळी डांबरीकरण व सुस्थितीत केलेल्या तारकर्ली येथील रस्त्याच्या दुतर्फा जलजीवन मिशनच्या कामासाठी खोदाई करण्यात आल्या आल्यानंतर चार महिने उलटले तरी त्याठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने वाहनांचे अपघात होत आहेत. तारकर्ली हे पर्यटन गाव जगाच्या नकाशावर असताना हा खोदाई केलेला रस्ता येत्या पंधरा दिवसात पूर्वीसारखाच सुस्थितीत करण्यात यावा, अन्यथा आपण ग्रामस्थांसह तारकर्ली बंदर येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी दिला आहे
नौदल दिना वेळी तारकर्ली गावात देशाचे पंतप्रधान नरेंद्र येणार असल्याने तारकर्ली गावातील रस्ते अगदी टापटीप मेकअप केल्यासारखे करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्त्याची कामे केली होती. पंतप्रधनांसह आलेले राज्यातील इतर मंत्री खुश व्हावे याकरिता तारकर्ली रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. यातून तारकर्लीत येणाऱ्या पर्यटकांना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना काही दिवसांसाठी आनंदी समाधानी करून या सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतःचे समाधान करून घेतले. परंतु नौदल दिना नंतर काही दिवसातच जलजीवन मिशन अंतर्गत हा रस्ता खोदण्यासाठी परवानगी देण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदाई करून त्यावर वाळू घालण्यात आली. मात्र, यानंतर चार महिने उलटले तरी रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते एकमेकाकडे बोट दाखवत आहेत. खोदाईमुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची चाके खोदाईवर टाकण्यात आलेल्या वाळूत रुतून अपघात होत आहेत. यामुळे रस्ताही खचत चालला आहे, अशी व्यथा सुरेश बापर्डेकर यांनी मांडली आहे.
पावसाळा जवळ येत असून या दुर्दशा झालेल्या रस्त्याचा पावसाळ्यात जास्त त्रास पर्यटक व नागरिकांना होऊ शकतो. हा त्रास होऊ नये म्हणूनच या रस्त्याची डागडुजी येत्या पंधरा दिवसात करण्याची मागणी आपण करत आहोत. तारकर्ली रस्त्याचे चांगले खडीकरण करून हॉटमिक्स डांबरीकरण येत्या पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास आपण ग्रामस्थांसह तारकर्ली बंदर येथे आमरण उपोषणाला बसणार, असा इशारा सुरेश बापर्डेकर यांनी दिला आहे.