डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी 2 आरोपींना जन्मठेप; तिघांची निर्दोष मुक्तता
आज विशेष न्यायालयाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे.
तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना निर्दोष ठरवले आहे. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांचा समावेश आहे. या दोघांना ही विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावत पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गेल्या 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांची शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दाभोलकर कुटुंबाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर या प्रकरणासंबंधित अनेक धागे-दोरे समोर येऊ लागले. पुढे या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली. हा तपास सुरू असताना सचिन अंदुरे, शरद कळस्कर, वीरेंद्र तावडे, अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांना अटक करण्यात आली होती.
शरद कळस्कर यानेच दाभोळकरांवर गोळी झाडल्याचा दावा सीबीआयने केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू होती. 2021 साली न्यायालयात पाचही जणांवरील आरोप निश्चित करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींवर हत्या, हत्येचा कट रचणे, युएपीए अंतर्गत गुन्हे निश्चित झाले होते. मात्र, या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात पुरावे सादर करण्यास पोलिसांना अपयश आले. त्यामुळे आज झालेल्या सुनावणीत या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे.