– परशुराम उपरकर
कणकवली
चिपी विमानतळ उद्घाटनाच्या तारखा केंद्र आणि राज्यातील नेतेमंडळी वारंवार जाहीर करत आहेत. प्रत्यक्षात काही विमानतळाच्या शुभारंभाला मुहूर्त मिळालेला नाही. मूळातच खासगी तत्त्वावरील हा विमानतळ चालण्याची शक्यताच नाही. तरीही सत्ताधारी मंडळी विमानतळाच्या मुद्दयावरून सिंधुदुर्गवासीयांची वारंवार फसवणूक करत असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.
येथील मनसे कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदी उपस्थित होते.
उपरकर म्हणाले, चिपी विमानतळ सुरू झाल्यानंतर पर्यटन वाढेल, रोजगार वृद्धी होईल अशी अपेक्षा सिंधुदुर्गवासीयांची आहे. मात्र या विमानतळाला अजूनही पाणी आणि वीज पुरवठ्याची सक्षम अशी व्यवस्था झालेली नाही. तसेच हा खासगी तत्त्वावरील विमानतळ आहे. यापूर्वी नाशिक, नांदेड या ठिकाणी विमानतळ कार्यान्वित झाले. मात्र प्रवाशांअभावी ते बंद पडले आहेत. तशीच गत सिंधुदुर्गातील विमानतळाची होणार आहे.
उपरकर म्हणाले, केंद्रात सुरेश प्रभू मंत्री होते, त्यावेळी देखील त्यांना चिपी विमानतळ सुरू करता आला नाही. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर छोट्या विमानातून गणपती आणला आणि विमानतळ सुरू झाल्याचा भास निर्माण केला. आता भाजपचे खासदार नारायण राणे हे चिपी विमानतळ २६ जानेवारीला सुरू होणार असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे पालकमंत्री उदय सामंत हे विमानतळाचा मुहूर्त अद्याप निश्चित झालेला नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे विमानतळाच्या मुद्दयावर राजकारणी मंडळींची टोलवाटोलवी सुरू आहे. यात सिंधुदुर्गवासीयांचीही फसवणूक केली जात आहे.