You are currently viewing अक्षय तृतीया

अक्षय तृतीया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री अनधा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*अक्षय तृतीया*

 

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया.आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त. कोणत्याही कामाची सुरुवात आपण या दिवशी करतो.

अन्नपूर्णा देवीचा वाढदिवस.

श्री विष्णूंचा सहावा अवतार ब्रह्मांड रक्षक परशुराम यांनी अक्षय तृतीयेला जन्म घेतला गोरज मुहूर्तावर. ते मातृभक्त होते, त्यांच्यासारखे तेजस्वी पुत्र व पराक्रमी पुत्र जन्माला येवोत ही प्रार्थना. त्यांना योध्दा देवता म्हणूनही ओळखतात.

आजच्या दिवशीच सुदामा पोरबंदर हून द्वारकेला पोचले होते आणि श्रीकृष्णाला पोह्याची पुरचुंडी दिली. त्यांचे मित्र प्रेम सर्वांना माहीतच आहे.

आजच्या दिवशीच सूर्य देवांनी द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते. अन्न पाण्याचा कधीही क्षय न होणारे असं हे पात्र. म्हणून आजच्या दिवशी अन्नदान करतात. मुळात दानाला आजच्या दिवशी महत्त्व आहे. आपल्या सामर्थ्यानुसार दान करावे.

आज पासून सत्ययुगाचा व त्रेतायुगाचा प्रारंभ झाला.

आजच्या दिवशीच महाभारत या महाकाव्याचे लिखाण सुरू झाले होते.

आजचा दिवस हा सुवर्ण दिवस मानतात कारण आजच्या दिवशी लक्ष्मी देवीने कुबेराला विपुल संपत्ती प्रदान केली. म्हणून आजच्या दिवशी सोने चांदी खरेदी शुभ मानतात.

नर आणि नारायण आजच्या दिवशीच प्रगट झाले. बद्रीनाथ धाम ला त्यांची निरंतर तपस्या सुरू आहे.

महाभारत युध्दाची समाप्ती आजच झाली होती.

ब्रह्मदेवांचे पुत्र अक्षयचा जन्म आजच्या दिवशीच झाला.

गंगाचे अवतरण आजच्या दिवशीच झाले. आजच्या दिवशी पवित्र नद्यांमधे स्नान करण्याला महत्त्व आहे.

बद्रीनाथ धामचे दरवाजे आजच्या दिवशी उघडतात.

बरेच जण आजच्या दिवशी गोमातेची सेवा करतात. आज केलेल्या पुण्यकर्माचा कधीही क्षय होत नाही. पूर्ण वर्षाचा महत्वपूर्ण दिवस असल्याने हा दिवस सर्वजण आनंदाने व उत्साहाने साजरा करतात.

पितरांना तर्पण देण्याला पण आज महत्त्वाचे मानले जाते.

आज वसंत ऋतू व ग्रीष्म ऋतू चा संधिकाल असतो कारण वसंत ऋतू संपून ग्रीष्म ऋतू ला प्रारंभ होतो.

जगन्नाथपुरीला जगन्नाथासाठी रथ निर्माण करण्याची तयारी आजपासूनच सुरू होते.

आदि शंकराचार्य यांनी “कनकधारा” स्तोत्र लिहायला आजच सुरवात केली होती.

 

असा हा आंब्यासारखा गोड सण आपल्या जीवनात आनंदाचे क्षण घेऊन येतो. आजपासूनच आंबा खायला सुरुवात करतात.

आपले सर्वांचे प्रेम अक्षय राहो ही सदिच्छा. आजची अक्षय तृतीया सर्वांना सुखाची कारक ठरो.

सर्वांना दीर्घायुष्याचा घट लाभावा हीच मंगलमय शुभेच्छा.

धन्यवाद.

 

सौ. अनघा अनिल कुळकर्णी.

पुणे. 🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा