शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 15 जून अखेर मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी
भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी 15 जून अखेर मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.
सन 2022-23 करिता पुन्हा शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी शासनाने दि.30 एप्रिल 2024 अखेर आदेशित केले होते. तथापि, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज कमी प्रमाणात प्राप्त होत असल्याने अनु, जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गासाठी सन 2023-24 करिता महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करकण्याकरिता तसेच सन 2022-23 करिता पुन्हा शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याकरिता शासनाने दि. 15 जून 2024 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रक्रीया आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व कनिष्ठ / वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करण्यात येते की, जे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्याध्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील असे पत्रकात नमूद आहे.
तसेच महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जाची छाननी करून परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव या कार्यालयाकडे वेळेवर वर्ग करण्याबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी तात्काळ कार्यवाही करावी. शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नुतनीकरण करण्याबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय (दूरध्वनी क्र.02362-228882) येथे संपर्क साधावा.