You are currently viewing उत्कृष्ट बाल वाङ्मयकार : प्राध्यापक सुमती पवार

उत्कृष्ट बाल वाङ्मयकार : प्राध्यापक सुमती पवार

*ॲड.मिलिंद मधुकर चिंधडे यांची स्तुतीसुमने*

 

मंगळवारी गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या “पुस्तकावर बोलू काही ” या उपक्रमात प्राध्यापक पवार मॅडमचे “चला कापडण्याला ” या पुस्तकावर, पुस्तक परिचयात्मक व्याख्यान होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्यांचे वैशाली प्रकाशनचे श्री विलासराव पोतदार हे होते. कार्यक्रम अतिशय माहितीपूर्ण आणि चांगला झाला.

विशेष म्हणजे मॅडमची 30 च्या वर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत त्यातील 27 पुस्तके वैशाली प्रकाशनने प्रसिद्ध केलेली आहेत. मॅडमचे आज वय 75 वर्षांच्या वर आहे. पण साहित्य विषयक कार्यक्रम असला तर त्यांचा उत्साह कायम असतो. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या महाविद्यालयाच्या 29 वर्षाच्या सेवेनंतर त्या सेवानिवृत्त होऊन देखील 15 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. गेले तीस वर्षे साहित्यातील वेगवेगळ्या प्रांतात त्या लिखाण करतात पण त्यातील कविता आणि त्यामध्येही बाल कविता लिहिणे त्यांना विशेष आवडते.

त्यांच्या सगळ्या पुस्तकांचे एक समान सूत्र आहे.ते म्हणजे वाचकावर कळत नकळत संस्कार करणे. त्यांनी लिहिलेली, “हे खरे खरे व्हावे “ही कविता 2016 मध्ये बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे, व CBSE बोर्डाच्या “वसुंधरा” नामक पुस्तकात इ. ६ वी साठीच “मला वाटते”नावाच्या कवितेचा २०२१ पासून समावेश झाला आहे.अनेक साहित्य विषयक उपक्रमांच्यामध्ये त्या वेगवेगळ्या पद्धतीने सामील झालेल्या असतात. मग कोठे त्या अध्यक्षा असतील तर कुठे त्यांना पुरस्कार मिळालेला असेल. त्यांच्या साहित्य विषयक लेखनात सातत्य असल्याने, त्यांना भरपूर साहित्य विषयक पारितोषिके मिळाली नसती तरच नवल.

त्यांची गद्य पुस्तके देखील तोलामोलाची आहेत. आपल्याकडील माहिती,ज्ञान नव्या पिढीला देण्याच्या भावनेतून त्या साहित्य सेवा करीत आहेत. त्यांची 20 बालगीतांची सुंदर “सुमतीची गाणी” नावाची कॅसेट निघाली आहे. मंगळवारी त्यांच्या “अमृतघट ” या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजक म्हणजे श्री सुरेश पवार यांच्यामुळे या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला माझे हातभार देखील लागले. त्याचा फोटो वर प्रदर्शित करीत आहे. हा कवितासंग्रह त्यांनी त्यांच्या परमप्रिय आई-वडिलांना अर्पण केला आहे.मला हा कवितासंग्रह पूर्ण वाचायचा आहे. पण सुरुवातीच्या दोन कविता पहिली गणपती देवा आणि दुसरी ज्ञानदेवांवरची वाचनीय आहे.

मॅडम वर नक्कीच सरस्वतीचा कृपाप्रसाद आहे. त्यांच्याकडून यापुढे देखील उत्तम साहित्य वाचकांपर्यंत पोहोचो. अशी या “अमृतघट” कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा देतो. तसेच गिरणा गौरव प्रतिष्ठान आणि श्री सुरेश पवार यांना लेखकांना पुस्तक प्रकाशनाच्या करता एक व्यासपीठ देत असल्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. पुस्तक प्रकाशनाची ही एक वेगळी गोष्ट “पुस्तकांवर बोलू काही” या 21व्या उपक्रमात घडली याची नोंद साहित्य क्षेत्र नक्की घेईल याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. पुन्हा एकदा प्राध्यापिका सौ सुमती पवार मॅडम यांना त्यांच्या पुढील वाटचाली करता मनःपूर्वक शुभेच्छा ———-

 

प्रा.ॲड.मिलिंद मधुकर चिंधडे.

प्रतिक्रिया व्यक्त करा