प्रस्थापित गडांवर भाजपाचे झेंडे रोवले जाण्यासाठी होताहेत मोठ्या हालचाली!
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात लवकरच फार मोठे बदल घडून येण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. भाजपाचे केंद्रीय नेते, खासदार तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ना. नारायणराव राणे, माजी राज्यमंत्री आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.रविंद्र चव्हाण, आमदार श्री नितेश राणे, माजी खासदार श्री निलेश राणे आदी नेते एकाचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणे हा योगायोग नक्कीच नव्हे असे राजकीय दाव्यासह बोलले जात आहे. या दाव्याला मजबूत पुष्टी देणारी घटना म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते मा.देवेंद्र फडणवीस यांचेही जिल्ह्यात झालेले आगमन.
देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील गोपनीय दौऱ्याची पूर्वकल्पना कोणालाही देण्यात आली नव्हती. दुपारी सावंतवाडीमध्ये फडणवीस यांचे अचानक झालेले आगमन जिल्ह्यात लवकरच मोठे भूकंप घडून येण्याची नांदी असल्याचे सूत्रांकडून समजते. या भूकंपाचा केंद्रबिंदू सावंतवाडी असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे. राजकीय विश्लेषकांची नजर जिल्ह्यातील पुढील हालचालीकडे लागून राहिली आहे.