You are currently viewing तर पाप लागेल हां..

तर पाप लागेल हां..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*तर पाप लागेल हां..*

 

“बघ हं,माझी शप्पथ आहे तुला”

 

“अगं नाही सांगत कुणाला… आधी सुटली बोल”

 

“माझी शप्पथ मोडलीस तर पाप लागेल हां???”

 

दोघी एकमेकींच्या मर्जीतल्या गोष्टी सांगत असताना हे शप्पथ घालणं, घेणं, सुटली बोलायला लावणं… किती सहज होत ना

काय असतं या शप्पथ घालण्यामागं? अशी कुठली मानसिकता असते की एखाद्या व्यक्तीने आईची किंवा आपली स्वतःची किंवा देवाची सुद्धा शपथ घातली की ती मोडायची नसतेच मुळी हे अंगवळणी पडलं होतं. ते बालपणीच आपल बाळबोध मन होतं का आपल्यावर झालेले ते संस्कार होते? शपथ मोडली तर ज्याची शपथ आहे तो माणूस मरतो त्यामुळे ती कधीच मोडायची नसते इतका साधा सरळ विचार.

“पाप लागेल हां…. असलं कामं मुळीच करू नये. देव सगळीकडे असतो तो बघत असतो….” बस् हे मनाच्या पाटीवरनं कधीच पुसलं गेलं नाही.

 

आता आता विचार पडतो ती खरंच पाप आणि पुण्य अशा कुठल्या संकल्पना अस्तित्वात आहेत तरी की नाही?

होय त्या फक्त भोळ्याभाबड्या लोकांना घाबरविण्याच्या संकल्पनाच म्हणाव्या लागतील न? कारण तसं पाहिलं तर जे लोक हे करू नका,पाप लागेल …असं वागलं पाहिजे मग पुण्य मिळेल असं सांगतात ते स्वतः तसं वागतात का?उलट दुसऱ्याला संभ्रमात ठेवून ते पाप करायला मोकळे होतात. तो नियम त्यांना लागू नसतोच कधी.अर्थात अपवाद असतातच पण फार थोडे. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण….ही म्हण खरी करणारे बरेच.

तसंही

पाप आणि पुण्याची संकल्पना व्यक्तीसापेक्ष असावी.

काही लोकांना मुंगी पायाखाली चिरडली जाणेही पाप वाटतं तर काहींच्या पाप सदृष्य कृतीमागे ही स्वतःचं लॉजिक असतं. पाप सुध्दा हे लोक अगदी सहजपणे जस्टीफाय करू शकतात. कारण त्यांच्या मते ते पाप नसतेच मुळी. तो एक साधा नफा तोट्याचा व्यवहार असतो.

जेव्हा दुसऱ्याच्या नजरेतून बघू तेंव्हाच जजमेंट पर्यंत पोहोचू शकू.

 

पुण्य केल्यानं काय मिळतं?

पुण्य म्हणजे काय हे ठरल्यावरच त्यातून काही मिळेल की नाही हे पहावं लागेल. लहानपणापासून ज्या बोधकथा ऐकत आलो आपण त्यात हेच तर सांगायचा प्रत्येक वेळी प्रयत्न असतो ना की पापाचा घडा भरला की शिक्षाही होणारच आणि कणाकणानं पुण्य साठवत गेलं की बक्षीस हे मिळणारच. माझी आजी सांगायची या जन्मी केलेलं पाप या जन्मीच फेडून जाव लागत, त्याशिवाय मोक्ष मिळत नाही. यातलं मोक्ष वगैरे गोष्टी आपण सोडून देऊ पण खरंच आज असं दिसतं का हो आपल्याला? उलट पाप करून पोट भरणारेच मोठे होताना आपण बघतो. तेच दुसऱ्यावर अन्याय करून करून बंगल्यातून गाड्यातून फिरतात, परदेशाच्या वाऱ्या करतात, मजेत चैनीत राहतात आणि जो खरंच पापभिरू गरीब माणूस असतो तो कुणाचे पाच रुपये जरी राहिले तरी दुसऱ्या दिवशी आठवणीने परत करायला जातो आणि त्यातच स्वतःची पाठ थोपटून घेतो. मग हे त्यांन पुण्य केलं तर त्याला काय बक्षीस मिळालं? पाप करून मोठे झाले त्यांना कुठे शिक्षा झाली? मोठे झाल्यावर रोजच्या जगण्यात जर का असा उफराटा न्याय बघायला मिळत असेल तर मग आपण आपल्या मुलांना या पाप आणि पुण्याच्या संकल्पना कशाच्या बेसिसवर शिकवायच्या? रेसमध्ये चीटिंग करून पुढे जाऊ नकोस त्यांन तुझा लॉन्ग टर्म मध्ये काहीही फायदा होणार नाही हे शिकवायचं? का शेजारच्याला ढकलून जो पुढे गेला आणि पहिला नंबर ज्यानं कढला त्याचं कौतुक करायचं? काय… आणि कस शिकवायचं?

 

अलीकडेच “ट्वेल्थ पास” नावाची एक फिल्म टीव्हीवर बघण्यात आली. अतिशय सुंदर फिल्म. त्यात तो हिरो परीक्षेमध्ये चीटिंग करत नाही. आदर्शवादाचं खूळ डोक्यात घेऊन कष्टाने मेहनतीने पुढे जातो आणि यूपीएससीच्या शेवटच्या मुलाखतीत सुद्धा थोडाही मालमसाला न टाकता अगदी खरंच बोलतो. आणि शेवटी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःच्या जिद्दीच्या बळावर त्याच्या वाट्याला जे घवघवीत यश येतं ती खरोखरच कुठलीही काल्पनिक कथा नसून प्रत्यक्षात घडलेली घटना आहे, यावर विश्वास बसत नाही.

 

म्हणजे इथं त्याच्या पुण्याचं फळ म्हणण्यापेक्षा त्यानं प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळालं असं म्हणता येईल. किंवा चांगल्या मार्गाने कुणालाही उपद्रव होणार नाही अशा प्रकारे मेहनत घेऊन केलेलं काम हे पुण्य असू शकत. पण हीच मेहनत जर का कुणाला तरी दुःख,उपद्रव देणारी असेल पण त्यांनं फक्त करणाऱ्या व्यक्तीचा फायदा होत असेल तर मात्र त्याला पाप म्हणायला हरकत नाही.

“इतकी पापं करशील तर नरकात जाऊन फेडावी लागतील”….दुष्ट, क्रूर लोकांना उद्देशून बोललेली ही अशी वाक्यं गोष्टींमधे आपल्यापैकी प्रत्येकाने ऐकली आहेत.

विज्ञानवादाच्या कसोटीवर जरी नाही तरी

थोडा अध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर उत्तर सापडायला मदत होईल.

जसं मन दिसत नाही पण ते असतं!

देव दिसत नाही पण तो असतो!

अगदी तसं पाप आणि पुण्य एकदम ठोसपणे बोट करून दाखवता येत नसले तरी ते असतात!

ही गृहीतकं निश्चित पणे जगण्याचं बळ पुरवतात. प्रसंगी आशेचा किरण दाखवतात. आणि काही वेळा दलदलीत रुतून खोल जाणाऱ्या एखाद्या माणसाला वेळीच आवरतात.

या संकल्पना आपण खऱ्या मानतो, गृहीत धरतो म्हणून थोडा तरी माणूस माणसासारखा वागतोय, नाही का?

 

अंजली दीक्षित-पंडित

९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा