नीलक्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी नारायण राणे यांना निवडून देणे आवश्यक – रविकिरण तोरसकर…
मालवण
मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची व्याप्ती वाढण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपला निवडून आणणे आवश्यक आहे. या योजनेचा केंद्रीयस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी नारायण राणे यांच्यासारख्या प्रशासनावर पकड आणि मत्स्य व्यवसायची पुरेपूर जाण असलेल्या नेत्याने लोकसभेत जाण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व मच्छीमार बांधव-भगिनी, मत्स्य व्यावसायिक, यांनी पंतप्रधान मोदी यांना अपेक्षित असलेली नीलक्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन भाजप मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
२०१४ ते २०२४ या कालावधीत भारतातील ८२०० किमीची किनारपट्टी तसेच मत्स्यपालन या क्षेत्राला बळ देण्यासाठी २०१४ ते २०१९ या काळात नीलक्रांती ही योजना, तर २०२१ पासून पुढे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. या योजनांमध्ये मत्स्य व्यवसायाबरोबरच मच्छीमाराला राहती घरे, बंदी कालावधीतील अनुदान, मासेमारी जाळी, नौका सक्षमीकरण, वाहतूक व्यवस्थेसाठी इन्सुलेटेड व्हॅन, प्रक्रिया उद्योग, बर्फ कारखाने तसेच खोल समुद्रातील मासेमारी अशा अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचा लाभ हजारो लाभार्थ्यांनी घेतला आहे. तसेच मत्स्य पालन करणाऱ्या मत्स्य शेतकऱ्यांसाठीही विविध योजना मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत राबविल्या आहेत. ४० ते ६० टक्केपर्यंत भरघोस अनुदान लाभार्थ्यांना गेल्या दहा वर्षांत मिळालेले आहे. मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सोयी-सुविधांचा विकास या योजनेत केलेला आहे. वीस हजार कोटी रुपयांची तरतूद या पाच वर्षांसाठी मोदी सरकारने केली होती. त्याचा पुरेपूर फायदा मत्स्य व्यवसायाला होत आहे, असे रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.
भाजपच्या जाहिरनाम्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विचार करता, अनेक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यात बर्फ कारखाने, यांत्रिक नौका सक्षमीकरण, पारंपरिक नौका, जाळी खरेदी, मत्स्यपालन क्षेत्र, मत्स्य सेवा केंद्र आदी योजनांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. भविष्यातील फायद्यासाठी राणेंना विजयी करणे आवश्यक आहे, असेही श्री. तोरसकर यांनी म्हटले आहे.