You are currently viewing कोकणचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नारायण राणेंच्या पाठीशी ठामपणे उभे रहा

कोकणचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नारायण राणेंच्या पाठीशी ठामपणे उभे रहा

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे आवाहन

 

सावंतवाडी :

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार केंद्रीय ना. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी येथील वैश्य भवन येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मेळाव्याला भेट देऊन उपस्थित सर्व महिलांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर निलमताई राणे, महिला जिल्हा प्रमुख ॲड. निता कविटकर, भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, अजित पवार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, अर्चना पांगम, अनारोजिन लोबो, अन्नपूर्णा कोरगावकर, संध्या तेरसे, भारती मोरे, अशोक दळवी, आदी उपस्थित होते.

 

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला. कोकणी माणसाचा हाच स्वाभिमान जागृत ठेवण्याचे काम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. कोकणचा सर्वांगीण विकास हाच ध्यास मानून ते अविरतपणे कार्यरत आहेत. केंद्रातील मंत्रीपदाच्या माध्यमातून ते कोकणाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या पुढील मंत्रिमंडळात देखील कोकणातील हे मंत्रीपद कायम ठेवून कोकणचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नारायण राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या रहा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

 

जिल्ह्याच्या विकासासाठी मी आणि नारायण राणे नेहमीच एकत्र असतो‌. त्यामुळे राणे पुन्हा मंत्री झाले पाहिजेत याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल भलं नरेंद्र मोदी, नारायण राणेच करू शकतात. बाकीचे केवळ भाषणं ठोकू शकतात असा टोला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांना हाणला.

 

लोकसभेच्या निवडणुकी निमित्ताने या महिला मेळाव्याच आयोजन केलं आहे. महिला ही आदिशक्ती, आदिमाया आहे. या आदिशक्तीला मी नमन करतो. महिलांमधील आदिशक्ती जेव्हा जागी होईल तेव्हा कोकणात बदल होईल. वेगवेगळ्या योजना महिलांसाठी योजील्या आहेत. त्याची जनजागृती महिलांमध्ये झालेली आहे. येणाऱ्या काळात बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार महिलांना उपलब्ध होणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. एखाद्या शेफ पेक्षा चांगले जेवण महीला करतात. घरगुती जेवणासाठी अनेक पर्यटक इथे पर्यटना निमीत्त येतात. ‘ब्रेड ॲण्ड ब्रेकफास्ट’ योजनेच्या माध्यमातून महिलांना ही संधी मिळेल. महिलांच्या हाताला रोजगार मिळावा हा माझा उद्देश आहे. रत्नसिंधू योजनेतून कुक्कुटपालन, काथ्या उद्योग आदीं सारख्या योजना राबविण्यात आल्या. त्यातून महिला बचत गटाला उत्पन प्राप्त होत आहे. काजूचे बोडू, फणासाचे गरे यांच्या पासून उत्पादीत होणाऱ्या वस्तूला परदेशातही बाजारपेठ उपलब्ध आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याचं बजेट मोठ आहे. मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे उद्योग यातून उपलब्ध होणार आहेत. तुमच्या उद्योगाची जबाबदारी आमदार म्हणून मी घेतलेली आहे‌. त्यासाठी नारायण राणेंना मतदान करून पुन्हा एकदा केंद्रात पाठवण आवश्यक असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कोकणाला काहीही मिळाल नाही. त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे एक रूपया पर्यटनासाठी खर्च करू शकले नाहीत. पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना बाळासाहेब हिंदू मानत नव्हते, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्यांना अभिमान होता. पण, उद्धव ठाकरेंनी कॉग्रेसच्या सोबत जाण पसंत केलं. बाळासाहेबांचे विचार सोडण पसंत केलं. आदित्य ठाकरेंनी सावरकरांवर बोलणाऱ्या राहूल गांधींना मिठी मारली अशी टीका दीपक केसरकर यांनी ठाकरेंवर केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा