“महाज्योती वैमानिक प्रशिक्षानार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होण्यासाठी करीत आहे पाठपुरावा।”
सिंधुदुर्गनगरी
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर संस्थेमार्फत नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर सोबत महाज्योतीच्या लाभार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी दि.२६.०२.२०२१ रोजी करार करण्यात आलेला आहे. सदर करारानुसार २० विद्यार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योती मार्फत विद्यार्थी व प्रशिक्षण शुल्क नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सामंजस्य करारानुसार प्रशिक्षण देण्याची संपूर्ण जबाबदारी ही नागपूर फ्लाईंग क्लब या संस्थेची आहे.
दि.२३.१०.२०२३ रोजी महाज्योतीच्या प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नसल्याबाबतची तक्रार महाज्योती कार्यालयाकडे केली होती. उपरोक्त प्रश्नाच्या अनुषंगाने दि.३०.१०.२०२३ रोजी नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर चे सर्व संबंधित अधिकारी, महाज्योतीचे अधिकारी व महाज्योतीचे विद्यार्थी यांची बैठक पार पडली, सदर बैठकीत प्रशिक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्याबाबत व विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांचे निवारण करण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक, नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केलेले होते.
महाज्योतीच्या प्रशिक्षणार्थी यांनी दि.१२.०४.२०२३ रोजी विद्यार्थ्यांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम व विमान उड्डाण प्रात्याक्षिक विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर यांना सूचना देण्याबाबत महाज्योती कार्यालयास निवेदन सादर केलेले होते. सदर निवेदनाच्या अनुषंगाने या कार्यालयाने प्रशिक्षण कार्यक्रम विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत पत्र क्रमांक महाज्योती/आस्था./ना.फ्ला.क./२०२३/१०८९ दि.१२.०४.२०२४ नुसार व्यवस्थापकीय संचालक, नागपूर फ्लाईंग क्लब, नागपूर यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तसेच वरिष्ठांना देखील सदर प्रकरणी उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत महाज्योतीने विनंती केलेली आहे. विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून घेण्याच्या दृष्टीने महाज्योती संस्थेमार्फत आवश्यक सर्व पाठपुरावा करण्यात येत असल्याचे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सांगितले आहे.