You are currently viewing ‘सावलीच्या पदराखाली’

‘सावलीच्या पदराखाली’

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम रचना*

 

*’सावलीच्या पदराखाली’*

**********************

गावाच्या पायथ्याशी उभा डोंगर

कधीकाळी राजबिंडा वाटायचा

दुरून सुद्धा रूबाब त्याचा

भारी दिसायचा

हिरवी हिरवी झाडे त्याच्या

अंगाखांद्यावर खेळायची

अल्लड हूल्लड झुळूक वाऱ्याची

धावतच यायची

वळणावरच्या वाटेवर

घनदाट जंगल असायचे

दूरदेशी पाखरे वस्ती करून राहायचे

 

अवतीभोवती गावा संगती

झाडांची गर्दी दिसायची

सावलीच्या पदराखाली

गारव्याची मिठी असायची

झाडांमुळे गाव कसे

शोभून दिसत होते

येताजाता माणसांची

भेट घेत होते

नवी नवरी वसुंधरा ही

नटून थाटून यायची

वृक्षवल्ली सोयऱ्या संगे

प्रदक्षिणा घालायची

 

कधीकाळी संध्याकाळी

अंगणात बसून मस्तपैकी

सळसळत्या पानांची

मस्ती बघायचो

झाडांशी गप्पा करताना

पक्षांची गाऱ्हाणी ऐकायचो

कुठून तरी गंध फुलांचा

दरवळून यायचा

बगळ्यांचा थवा आभाळात

गिरक्या घ्यायचा

 

लाजरी बुजरी नदी कशी

खळखळ वाहत रहायची

कावड खांद्यावर घेऊन ती

घरा घरातले रांजण भरायची

गुरढोरही तिथे तिच्याजवळ

घडीभर विसावा घेत होती

कासावीस झाल्या जीवाची ती

तहान भागवत होती

 

पाऊसही न सांगता

दिर्घ मुक्कामाला यायचा मुक्काम

नदी नाले विहिरी गच्च भरून द्यायचा

झरे झिरवे ही ओसंडून वहात होती

चिमणी पाखरे चोचा मारून

भुर्र उडून जात होती

थेंबे थेंबे पाण्याने माती गर्भार व्हायची

पावसाच्या सरी तिच्या

बाळंतपणाला यायची

शेतमळे कसे धनधान्याने

भरून जात होते

सुगीचे दिवस डोळेभरून पाहत होते

 

पण….आता…..

रोज झाडांची कत्तल होते

डोक्यावरची सावली जाते

तप्त उन्हात जीव कासावीस होतो

घडीभर विसाव्यासाठी

माणूस झाड शोधत फिरतो

अरै झाडे नाहीत म्हणूनच

पाऊसही पडत नाही

हंडाभर पाण्यात कुणाचीही

तहान भागत नाही

तेव्हा नका तोडू झाडे

झाडे लावा झाडे जगवा

सारेच पुन्हा हिरवेगार होईल

माणसा माणसांच्या आयुष्यात

पुन्हा नंदनवन येईल

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४८

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा