You are currently viewing रिंकुचे आज्जीला पत्र

रिंकुचे आज्जीला पत्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*रिंकुचे आज्जीला पत्र*

———————

ती.सौ.अनुआजीस

चि. कु.रिंकुचा साष्टांग नमस्कार

 

माझे पत्र पाहून तुला आश्चर्य वाटेल, त्यापेक्षा पत्राची सुरुवात पाहून तुला खूप आनंद होईल. तू म्हणशील-

रिंकू मराठीतून पत्र लिहिते , हे नवल कसे घडले म्हणायचे?

 

आजी, तुला एकूणच आमच्या या नव्या पिढीविषयी कुतूहल आहे, त्यामागे तुझ्या मनात आमच्याविषयी असलेला जिव्हाळा, माया आणि प्रेम आहे” हे तुझ्या सहवासात राहून

मला समजू लागले आहे.

तू सहा महिने आमच्याकडे असतेस, मग मोठ्या काकांच्या कडे तुझा मुक्काम असतो” हे मी लहानपणापासून पाहते आहे.

एक मात्र मानले पाहिजे- तू ज्या घरी असतेस, तिथेच तू पूर्णपणे एकरूप होऊन राहतेस, कधी कुणाला झुकते माप नाही की कुणाला नांवे ठेवत नाहीस.

“बॅलन्स कसे रहावे”हे तुझ्याकडून ,आबांच्याकडून

आपल्या फॅमिलीतल्या सगळ्यांनी शिकून घेतले आहे.

 

आजी, माझे शिक्षण इंग्रजी मीडियामध्ये असले तरी

ईतर वेळी मातृभाषा मराठीचा वापर मी माझ्या बोलण्यात ,लिहिण्यात, वाचनात भरपूर करते.

मला मराठीची जी गोडी लागली , ती आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे”.

बाबांच्या संग्रही कॉलेजच्या दिवसात तुम्ही त्यांना पाठवलेली पत्र आहेत, त्यातून मला कळाले, जाणवले की-

आई-वडिलांच्या भावना मुलांनी वेळेवर समजून घेतल्या तर,

नाते अधिक घट्ट होते.

शाळेतील माझ्या वर्ग मित्र-मैत्रिणींशी मी बोलते तेंव्हा त्यांच्या बोलण्यात एक वेगळा सूर असतो-

ते म्हणतात- आमचे आई-बाबा मागेल ते देतात, पण ते दिले की आमच्या जवळ बसून बोलण्यासाठी त्यांना वेळ नसतो.

 

आजी- यामुळे ” आई-वडिलांच्या प्रेमाला आसुसलेली ही मुले, मनाने दूर दूर जातात, हे अंतर कमी करणे आई-बाबांना जमले नाही, की मग अजूनच कठीण होऊन बसते सगळं.

तू म्हणशील- रिंकू फारच चिंतनपर लिहायला लागली आहे.

आजी- तू म्हणतेस ना, मन मोकळं करण्यासाठी “पत्र”

सर्वात छान माध्यम आहे. पत्रातून थेट मनात प्रवेश होतो.

तुला हे पत्र लिहितांना माझी हीच भावना आहे.

 

सातवीतल्या या मुलीला, आठवीत गेल्यावर मराठीत छान लेखन करायचे आहे, भाषण लिहिणे, निबंध लिहिणे, कविता लिहिणे, यासाठी मदत , मार्गदर्शन तुझे , नि प्रयत्न माझे.

पुढच्या सहा महिन्याच्या मुक्कामात “आपली मराठी कार्यशाळा”नक्की !

ती.आबांना, ती.मोठ्या काकांना, ती.सौ.काकूंना

माझा शि. सा.न.

तुझी लाडकी नात-

रिंकू

—————————————-

दिव्य मराठी- किडस् कॉर्नरसाठी

लेख-

रिंकुचे आज्जीला पत्र-

ले- अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342

————

प्रतिक्रिया व्यक्त करा