माडखोल उपसरपंचांच्या मनमानी विरोधात वृद्ध दांपत्याचा “घंटानाद”…
प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप…
सावंतवाडी
पदाचा गैरवापर करून सामाईक जमिनीत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या माडखोल येथील उपसरपंच कृष्णा राऊळ यांच्या विरोधात वृध्द दांपत्याने येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आज “घंटानाद आंदोलन” केले आहे. संबंधित दांपत्य हे राऊळ यांचे काका व काकी आहेत.
दरम्यान आपल्यावर अन्याय झाला असून आपल्याला न्याय देण्यात यावा, अशी त्यांनी मागणी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत आपण तंटामुक्ती समितीचे लक्ष वेधले होते, परंतु आपल्याला न्याय मिळाला नाही असे या दांपत्याचे म्हणणे आहे. त्यामुळे कायदेशीर तरतुदीनुसार संबंधिताचे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच पद रद्द करण्यात यावे व अनधिकृत बांधकाम तोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन असेच चालू राहील असा इशारा दिला आहे.
याबाबत त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, माडखोल-फौजदारवाडी येथील उपसरपंच पदावर असलेले कृष्णा राऊळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अतिक्रमण करून आमच्या घराच्या बाजूला लागून साधे तीन फूटही अंतर न सोडता सामायिक मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम करून आमच्या राहत्या घराला धोका निर्माण केला आहे.
आम्हा वयोवृद्ध दांपत्याला मुलगा नसल्याने शेतीच्या माध्यमातून आम्ही आमचा उदरनिर्वाह करत आहोत. दरम्यान न्याय मिळावा यासाठी तंटामुक्ती विभागाकडे याबाबत अर्ज करून सुद्धा अध्यक्ष व सचिव यांनी कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे महसुली दंडाधिकारी म्हणून बेकायदा बांधकाम करत कायदा हाती घेतलेल्या कृष्णा राऊळ यांचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य पद रद्द करून बांधकाम पाडण्यात यावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे यात म्हटले आहे.