ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून पहिल्या दिवसावर पूर्णपणे टीम इंडियाचं वर्चस्व राहिलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची 36-1 अशी धावसंख्या होती. तसेच टीम इंडियाकडून मैदानात चेतेश्वर पुजारा 7 आणि शुभमन गिल 28 धावांवर नाबाद आहेत. त्याआधी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंचा पहिला डाव 195 धावांवर गुंडाळला.
आजच्या सामन्यात गोलंदाज मोहम्मद सिराज आणि सलामीवीर शुभमन गिल या युवा खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ढिसाळ कामगिरी केली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियात एकूण 4 बदल करण्यात आले. यामध्ये दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली. तर पृथ्वी शॉच्या जागेवर शुभमन गिल याला ताफ्यात दाखल करुन घेतलं.
सामन्याआधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुभमन गिलला टीम इंडियाची कॅप दिली. गिल टीम इंडियाकडून कसोटीत पदार्पण 297 वा खेळाडू ठरला. तर गोलंदाज मोहम्मद सिराजला अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने कॅप देऊन टीम इंडियाच्या प्लेइंग इलव्हेनमध्ये स्वागत केलं. सिराज टीम इंडियाचा 298 वा खेळाडू ठरला. मोहम्मद सिराजने पदार्पणातच शानदार गोलंदाजी केली. सिराजने आजच्या सामन्यात पहिल्या डावात गोलंदाजी करताना 15 षटकांपैकी 4 षटकं निर्धाव टाकत 40 धावांच्या बदल्यात दोन विकेट्स मिळवल्या. त्याने मार्नस लॅबुशेन आणि कॅमरॉन ग्रीन या दोघांना बाद केलं.
सामन्यानंतर टीम इंडियाचे फिल्डिंग कोच (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) आर. श्रीधर यांनी हैदराबादी अंदाजात बातचित केली. यावेळी डेब्यू आणि गोलंदाजीचा प्लॅनविषयी सिराजने माहिती दिली. त्यानंतर श्रीधर सिराजचं कौतुक करत हैदराबादी स्टाईलमध्ये म्हणाले की, ‘मौत डाल दिया, मियां.’
श्रीधर यांनी सिराजला विचारले की, “लंच ब्रेकपर्यंत तुला गोलंदाजी दिली नव्हती. तेव्हा डोक्यात काय सुरु होतं. हाथाला खाज सुटली होती का?” यावर सिराज म्हणाला की, “लंचपर्यंत गोलंदाजी मिळाली नव्हती. परंतु अजिंक्य भाई (कप्तान रहाणे) आणि जसप्रीत भाई (बुमराह) या दोघांनी माझा आत्मविश्वास वाढवला. लंचनंतर गोलंदाजी मिळाली. तेव्हा डोक्यात एकच गोष्ट होती की जास्तीत जास्त डॉट बॉल टाकेन, जेणेकरुन समोरच्या फलंदाजांवर दबाव निर्माण होईल. त्याचा मला फायदाच झाला आणि सुरुवातीलाच एक विकेट मिळाली”.
त्यावर श्रीधऱ म्हणाले की, “तुझी गोलंदाजी पाहून मजा आली, एकदम मौत डाल दिया मियां”. त्यावर सिराज उतरला “हां भाई, मौत डाल दिया”.