*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*१६)माझे गाव कापडणे…*
किती छान वातावरण होते माझ्या लहानपणी!
आता ते जास्तच आठवते. बायकांना कष्ट फार
होते पण त्यांनी कधी त्याचा बाऊ केला नाही.
जीवनाचा अपरिहार्य भाग म्हणून त्यांनी ते स्वीकारले होते. घरोघर कष्ट होते. त्यातून कुणीही सुटले नव्हते. कामाची जात फक्त वेगळी होती पण काम नाही असे एकही घर नव्हते. मार्च एप्रिल मध्ये गहू हरबरा तयार होतो.सर्व शेते हिरवी पिवळी सोनेरी अशी वाऱ्यावर लहरतात, ती लहर इतकी सुंदर असते
की डोळ्यात भरून घ्यावी. त्या साठी मात्र शेताच्या बांधावरच जाऊन उभे रहायला हवे. त्या शिवाय ते कळतच नाही. मी हा अनुभव बऱ्याच वेळा घेतला आहे. हरभऱ्याचे घाटे व गव्हाच्या कोवळ्या लोंब्या सालदार कापून आणायचा. बांधावरच काडी कचरा गोळा करून पेटवायचा. आम्हाला जवळच गोणपाट
अंथरून द्यायचा.मस्त जाळावर त्या लोंब्या हरभरे भाजायचा. गरम गरम एका गोणपाटावर
टाकून रगडायचा, की मस्त कोवळे गव्हाचे कोवळे दाणे म्हणजे हुरडा बाहेर पडायचा. तोच
हातावर फुंकर मारून आमच्या हातावर टाकायचा. तो हिरवा पिवळा कोवळा हुरडा..
वाह वा .. मी मला बांधावर हुरडा खातांना दिसते आहे. हरभरे भाजून जवळ ठेवलेले असत. जाळाने काळा झालेला तो एकेक घाटा
सोलायचा व गरम गरमच तोंडात टाकायचा. हात व तोंड दोन्ही काळे झालेले मोठे मजेशिर
दिसत असत.मग एकमेकांकडे पाहून हसायचे
आपली तोंडे पाहून! हे सगळे आता शक्य आहे का हो? आता हुरड्यालाही पारखे झालो आपण! परवा हातगाडीवर तयार हुरडा मिळाला तो मी हौसेने भाजून खाल्ला.
लोक ही आता हुशार झाले आहेत, काय कुठे कसे विकावे हे बरोबर कळते त्यांना. ४/५ वर्षांपूर्वी आम्ही २/३ मैत्रिणी बडोदा साहित्य
संमेलनाला चाललो होतो.घरची गाडी ड्रायव्हर
असल्यामुळे आरामात जात होतो. रस्त्यावर
सुरतच्या अलिकडे ठिकठिकाणी हुरडा तिथल्या तिथे भाजून मिळत होता.मी तर लगेच
गाडी थांबवलीच. विशेष म्हणजे तिळ टाकून मिळत होता. वाह वा.. मन तृप्त झाले अगदी.
ह्या गोष्टींची चव लहानपणी ज्यांनी हुरडा शेतात खाल्ला आहे त्यांनाच त्याची मजा कळणार!
गहू निघाल्यावर त्याची कापणी होते. हातावर पोट असणाऱ्यांना शेती नसते. मग गहू ही नसतात. खेड्यात रोज बाजरीची भाकरी असते.सणासुदीला पोळी असते. मग हे गरीब
लोक गहू कापून झाले की त्या शेतात “सरवा”
सरा, वेचायला जातात. मालकाला विचारून.
कापणी झाली तरी शेतात भरपूर लोंब्या इतस्तत: पडलेल्या असतात.पाटी घ्यायची नि
त्या लोंब्या दिवसभर वेचायच्या.घरी आणून लाकडाने हळूहळू ठोकायच्या.पायली दोन पायली गहू सहज मिळतात.मग गोरगरीबाचा
सण ही होतो व शेवयाही होतात. थोड्या पाटाच्या, थोड्या हाताच्या करायच्या. उन्हाळ्यासाठी साठवायच्या.सरव्यातले निम्मे
गहू शेतमालकाला द्यायचे.हो,शेत त्याचे आहे ना? मग निम्मे वाटा त्याचा.
एप्रिल मे दोन महिने शेतकऱ्याचे मोठे धामधुमीचे असतात.पिक काढणी, विक्री, आणि पावसाळया पुर्वीची शेताची मशागत
करून शेत तयार ठेवणे. शेतात गहू ज्वारी हरभऱ्याची धसे असतात. नांगरटी वखरटी करून ती धसे काढणे, मजुर लावून वेचणी करणे,(ही धसे व तुरीच्या कपाशीच्या काड्या
चुलीत फार छान जळतात. गोरगरीब वेचून आणतात व वापरतात. आम्हीपण वापरत होतो.खाली थोड्या तुरीच्या काड्या, वरून
कपाशीच्या काड्या ठेवायच्या. आगपेटी तुरीच्या काड्यांना लावताच पटकन् पेटतात.मग कपाशीच्या काड्या मस्त जळतात
हळू हळू.वरून एखादे लाकूड ठेवले की जाळ
विझत नाही व स्वयंपाक धूर न होता करता येतो.हे खेड्यातील टेकनिक अनुभवातूनच कळते नाही तर घरभर धूरच धूर नि डोळ्यातून
पाणी! घराला एकच दार असेल तर मग बघायलाच नको, फू फू करून जीव हैराण होतो.
मे महिना अखेरीस शेतातला काडी कचरा वेचून नांगरून वखरून खत पसरवून शेते कशी
काळीभोर दृष्टलागावी अशी सुंदर दिसतात.
जणू सांगतात, पावसा ये बाबा केव्हा ही,
आम्ही तुला पोटात साठवून घ्यायला अगदी आतुर आहोत.
या तयारीत पेरणी साठी बी बियाणे तयार ठेवणे हा मोठा भाग असतो. कपाशीची सरकी
पेरणी साठी बाजारात मिळते पण भुईमुगाच्या
शेंगा ज्या बियाण्यासाठी साठवलेल्या असत
त्या फोडायचा मोठा जंगी कार्यक्रम घरोघर चाले.बायकांनी शेंगा फोडायला पाट किंवा दगड आणायचा व मालकाकडून शेंगाची पाटी
भरून घेऊन दोन्ही हातांनी बोटांनी शेंगा फोडायच्या.अशा १०/२० बायका ओट्यावर शेंगा फोडायला बसत व आपापल्या वेगाने शेंगा फोडत.टचा टचा टचा ..आवाज घुमायचा.
दिवसभर गलका व माझी लुडबुड !शेंगा देणे,
मध्येच शेंगा फोडणे,एखाद्या शेंगेवर एक विशिष्ट खूण असे. त्याला आम्ही कोल्हं म्हणत
असू. मग मला कोल्हं सापडलं,म्हणत खेळायचं, असे उद्योग चालायचे.मग संध्याकाळी बायका आपापल्या सुपाने शेंगा
पाखडायच्या. ओट्यावरच. त्या पाखडून दाणे
पाटीत भरून बसत. मग आई यायची व आदलं
पायलं मापे (तांब्याची किंवा पितळेची असत)
घेऊन प्रत्येकीचे दाणे मोजून घ्यायची. व दोन आणे पायली वगैरे असे भाव असायचे तेव्हा त्या प्रमाणे प्रत्येकीला पैसे द्यायचे.या शेंगा फोडतांना दाण्याच्या खापा व्हायच्या, त्या वेगळ्या करत असत. मालकाकडून बायकांना
थोड्या खापा ही मिळत. मग त्या भाजायच्या,
पाट्यावर लसूण घालून वाटायच्या व रात्री
भाकरी बरोबर हरभऱ्याची डाळ व कांदा परतून घालून मस्त
आमटी म्हणजे भुईमुंगनं बट्ट करायचं व बाजरीच्या भाकरीत चुरून पापड तोंडी लावत
हाश हुश करत खायचं.. अहा.. तोंडात पाणीच
आलं हो! जोडीला लोणचं असेल तर अहाहा..
क्या बात है..असे धामधुमीत दिवस जायचे.आई तर किती तरी दिवस या खापाच वापरायची स्वयंपाका साठी, दाण्याच्या कुटासाठी.अगदी कापरासारखे उडून गेले हो
हे दिवस …सुगंध मात्र विरला नाही अजून इतक्या वर्षा नंतरही … आहे ना गंमत ?
उन्हाळ्यात आणखी एक मोठा गोंधळ असे, तो
म्हणजे कांदे निवडायचा..उन्हाळी कांदा घरभर
साठवलेला असायचा.चांगला भाव मिळावा म्हणून. तो जसजसा वाळतो तस तसा त्याला असलेली सालं वाळतात. व ती साफ करावी
लागतात नाही तर कांदा सडतो.कांदा गोडाऊन
मध्ये मावेना.मग तो राहते घर, ढोर घर असा जमेल तिथे मोकळा साठवला जायचा.स्वयंपा
कघर सोडून जिकडे तिकडे कांदेच कांदे. मध्ये
चालायला एक उभे लाकूड ठेऊन घरे कांद्याने
गच्च! मधल्या लाकडावरून उड्या मारत मी
चालत असे.रात्रभर शेतातून गाड्या भरून कांदा
अंगणात ओतत. गाड्या आल्या रे आल्या की बायका गरागरा गोळा होऊन कांदे निवडू लागत. सालं काढायची व कांदे टोपल्यात टाकायचे. टोपले भरले की सालदार ते घरात ओते. असे रात्रभर काम चाले ते पहाटे संपे.
केवढी मेहनत, केवढा खर्च पण कधीच मना
सारखा भाव मिळत नाही. पण बिचारा शेतकरी
आशेवर कांदा लावत राहतो व कर्जबाजारी होतो.वडिलांना कधी कांद्याने हात दिला नाही
तरी त्यांनी कधी कांदा लावणे सोडले नाही.
शेवटी नशिबाचा भाग असतोच ना? शेतकऱ्याचे जीवनच असे आहे.सतत काट्यावर
चालावे लागते. थांबून चालत नाही म्हणून चालावे लागते. कारण थांबला तो संपला..
शेतकऱ्याचे जीवनच मोठे कठीण आहे हेच खूप
लोकांना माहित नाही. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” ….
खेड्यात ज्यांचे जीवन गेले ते या सर्व गोष्टींना परिचित आहेत पण शहरात राहणाऱ्या बऱ्याच
लोकांना शेतकऱ्याच्या कष्टमय व अस्थिर यातनामय जीवनाची कल्पना नाही. त्यांनी जरूर या जीवनाचा जवळून अभ्यास करायला
हवा. शेवटी शेतकऱ्याने पिकवले नाही तर तुम्ही
खाणार काय ? लक्षात ठेवा खायला शेवटी
भाकरीच लागते हे सत्य तुम्ही कधीच नाकारू
शकत नाही.
धन्यवाद मंडळी..
जयहिंद जय महाराष्ट्र..
आपलीच,
प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक
(९७६३६०५६४२)