*१० हजार तरुणांना जर्मनीत पाठविण्याचे आश्वासन देण्यापेक्षा राणेंनी आपल्या दोन्ही मुलांना जर्मनीमध्ये पाठवावे मग सिंधुदुर्गात रोजगार उपलब्ध होईल*
*आ. वैभव नाईक यांचा खोचक टोला*
१० हजार तरुणांना जर्मनी मध्ये पाठवणार असे नारायण राणे सांगत आहेत. १० हजार जाऊदेत राणेंनी फक्त आपल्या दोन मुलांनाच जर्मनी मध्ये पाठवावे त्यांना जर्मनीमध्ये पाठविल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहील.दडपशाही कमी होईल. आणि अनेक लोकांना रोजगारही मिळेल. आणि नारायण राणेंना देखील मनशांती मिळेल. असा खोचक टोला आ. वैभव नाईक यांनी लगावला आहे.
आ. वैभव नाईक पुढे म्हणाले, नारायण राणे गेली ३५ वर्षे निवडणुका आल्या कि तरुणांना रोजगार देतो अशी आश्वासने देत असतात. याआधी महिला भवन मध्ये अनेक महिलांना रोजगार देतो. वागदे येथे कौशल्य विकासच्या अनुषंगाने बोर्ड लावून उद्घाटन करून हजारो तरुणांना रोजगार देणार अशी ग्वाही दिली होती. मात्र ते केवळ आश्वासनच राहीले. राणेंकडून कुडाळ आणि ओरोस मध्येही असेच रोजगाराचे फसवे कार्यक्रम घेण्यात आले. राणेंनी ३ वर्षापूर्वी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खात्यातून अनेक लोकांना रोजगार, कर्ज मिळणार असे सांगितले. परंतु आपल्या मालकीची जागा कॉयर बोर्डसाठी भाड्याने देण्यापलीकडे सिंधुदुर्गात कोणतेही काम राणेंना जमले नाही. निवडणूक आली की राणेंची दोन्ही मुले रोजगार मेळावे घेतात मात्र एकाहि तरुणाला ते रोजगार देऊ शकले नाही. हि वस्तुस्थिती तरुणांना देखील माहित आहे. अशी टीका आ. वैभव नाईक यांनी केली आहे.