स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांअभावी महिला रुग्णांना परतवून लावण्याची रुग्णालयीन कर्मचाऱ्यांवर नामुष्की
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आरोग्य यंत्रणेची तज्ञ डॉक्टरांअभावी होणारी वाताहात सुधारू शकले नाहीत ही खरी शोकांतिका
कुडाळ :
कोट्यावधी रुपये खर्च करून दहा वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांअभावी अक्षरशः दयनीय अवस्था झालेली आहे. स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने प्रसूती व इतर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या सर्वसामान्य महिला रुग्णांना मागे परतवून लावण्याची नामुष्की रुग्णालयीन कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. मागील दहा वर्षांचा कालावधी लक्षात घेता जिल्हाच्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेत असलेले डॉक्टरांची कमतरता आजही जैसे थेच असून लोकप्रतिनिधींनी मारलेल्या फुशारक्या बाता फक्त जाहीर सभा व निवडणूक प्रचार पत्रकांमध्ये छापून आणण्यापुरतेच मर्यादित राहिलेले आहेत ही खरी आम्हा जिल्हावासीयांची शोकांतिका आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे लाखो रुपये दर महिना हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे पगार व देखभाल दुरुस्तीसाठी खर्च होत आहेत,मात्र सर्वसामान्यांच्या पदरात गोवा बांबुळी पर्यटन आहे हे चित्र काही बदलले नाही.शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्यात खाजगी रुग्णालये सर्वसामान्य जनतेची वैद्यकीय सेवेच्या नावाखाली लुबाडणूक करत आहेत.खाजगी रुग्णालयातील लुटीचे रॅकेट शासकीय रूग्णालयात तज्ञ डॉक्टर टिकू देत नाहीत की काय अशी शंका निर्माण होत असून खाजगी रुग्णालयातील गर्दी वाढवण्यासाठीच शासकीय रुग्णालये जाणीवपूर्वक ओस पाडली जात आहेत.
जिल्ह्यात निवडणुकांचं बिगुल गजबजलं असून आजी माजी लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी कोणते प्रयत्न केले? जिल्ह्यात तज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कोणत्या धोरणात्मक गोष्टी वरिष्ठ स्तरावर मांडल्या? खाजगी डॉक्टरांकडून जनतेची होणारी लूट थांबण्यासाठी काय प्रयत्न केले ? असे प्रश्न उभे राहत असून जनतेनेही या सगळ्याचा सारासार विचार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला कुणीही वाली उरला नसून रुग्णालयाच्या इमारती उभ्या करणे म्हणजे आरोग्य सुविधा देणे असा अर्थ होत नसून लोकप्रतिनिधींचे डोळे नक्की उघडणार तरी कधी असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी उपस्थित केला आहे.