You are currently viewing विविध उपक्रमांव्दारे मतदान जनजागृती

विविध उपक्रमांव्दारे मतदान जनजागृती

विविध उपक्रमांव्दारे मतदान जनजागृती

  • दशावतार नाटकातून जनजागृती
  • नऊ हजार बचत गट सरसावले

सिंधुदुर्गनगरी 

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, शाळा, महाविद्यालये यांच्या माध्यमातून मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले.

 जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी  किशोर तावडे यांनी जिल्ह्यातील सर्व मतदार बंधूभगीनींना  केले आहे.

            समाजातील सर्वच घटकांना मतदान प्रक्रियेत सामील करून घेऊन नवे मतदार तसेच महिला मतदार, दिव्यांग मतदार, पारलिंगी मतदार, संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्यापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात मतदार जनजागृती मोहीम राबवून त्यांना मतदान करण्यास उद्युक्त करण्यासाठी गावात मतदान शपथ, रांगोळी स्पर्धा घेऊन त्या माध्यमातून मतदान जनजागृती करणे, पारंपरिक कलेच्या माध्यमातून मतदान जागृती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

             सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर तसेच जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावात प्रभातफेरी आयोजन, जिल्ह्यातील विविध महाविद्यालये व ज्युनियर कॉलेज मधून युवक-युवतींसाठी मतदान करणे का गरजेचे या विषयावर प्रबोधन करणारी व्याख्याने, निबंध स्पर्धा, दशावतार नाटकातून जनजागरण आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. विशेषता 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने मतदान जागृतीबाबत तरूणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहीत करण्यावर भर दिला जात आहे. विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 9 हजार 800 महिला बचत गटाच्या महिला सदस्यांच्या माध्यमातून गट, ग्रामसंघ व प्रभागसंघाच्या मासिक बैठकीमध्ये तसेच घरोघरी भेटी देऊन जनजागृती केली असल्याचेही श्री.पाटील म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा