You are currently viewing भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी : कविवर्य शिवा इंगोले

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी : कविवर्य शिवा इंगोले

 

मुंबई महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य केलेले सुप्रसिद्ध सामाजिक बांधिलकीचे कवी श्री शिवा इंगोले यांना यावर्षीच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री बाबा आमटे यांचे चिरंजीव व आनंदवन या आंतरराष्ट्रीय परिवाराचे सर्वेसर्वा डॉ. विकास आमटे व श्री शिवा इंगोले यांची या पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.खरं म्हणजे हा बहुमान फार कमी व्यक्तींना प्राप्त होतो. या बहुमानासाठी श्री शिवा इंगोले यांची निवड झाल्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. खरं म्हणजे सुपर क्लास वन ऑफिसर म्हटला म्हणजे आपणास काही आगळे वेगळे वाटते. पण शिवा इंगोले एवढ्या मोठ्या उच्चपदस्थ जागेवर असून देखील जमिनीवर चालणारा माणूस आहे. खऱ्या अर्थाने हा माणूस कविता जगला. सामान्य माणसाची दखल घेणारा त्याच्या अडीअडचणीला धावून जाणारा आणि सदैव सामाजिक भान राखून काम करणारा माणूस म्हणजे शिवा इंगोले. शिवा इंगोले यांच्या कार्याची सुरुवात आमच्या अमरावती शहरापासून झाली. त्यांचे मामा श्री दादा इंगळे हे सुरेश भटांचे जिवलग मित्र. अनेक वेळा सुरेश भटांचा मुक्काम हा दादा इंगळे त्यांच्याकडे असायचा. शिवा इंगोले यांचा स्वभाव सुरुवातीपासून लोकाभिमुख होता. त्यामुळे आपल्या कार्यालयीन कामाबरोबरच त्यांनी साहित्य चळवळीला वाहून घेतले होते. सुमारे ४० वर्षांपूर्वी त्यांनी अमरावतीला अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन घेतले होते. खरं म्हणजे त्या काळात अशा प्रकारचे अखिल भारतीय साहित्य संमेलन घेणे म्हणजे तारेवरची कसरत होती. फारसे आर्थिक पाठबळ नसताना व कोणी धनाढ्य व्यक्ती सोबत नसताना शिवा इंगोले यांनी हे पाऊल उचलले आणि नुसतं उचलले नाही तर हे संमेलन खऱ्या अर्थाने अखिल भारतीय स्वरूपाचे करून दाखविले. तत्कालीन खासदार व सुप्रसिद्ध कवियत्री सौ. उषाताई चौधरी ह्या कवीवर्य शिवा इंगोले च्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि अमरावती शहराच्या इतिहासात नव्हे मराठी साहित्याच्या इतिहासात हे अखिल भारतीय मराठी दलित साहित्य संमेलन आपला मैंलाचा दगड होऊन गेले. शिवा इंगोले यांच्या जीवनाची सुरुवात लिपिक पदापासून झाली. अमरावती शहरात प्रशांत विद्यालय आहे. या प्रशांत विद्यालयातील ते लिपीक होते. परंतु आपल्या गुणवत्तेच्या आधारावर ते सतत एक एक पायरी वर चढत गेले. पण प्रत्येक पायरी चढत असताना त्यांनी आपल्या सोबतच्या लोकांना कधीही दूर केले नाही. मुंबईला महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकारी असताना त्यांचा संपर्क सतत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लोकांशी यायचा. पण असे असले तरी ते त्यांच्या सर्वसामान्य साहित्यिक परिवाराला कधीही विसरले नाहीत. अमरावतीहून त्यांचा मित्र मुंबईला गेला आणि त्यांच्याकडे न राहता आला असे कधीच झाले नाही. कारण या माणसाचा स्वभाव. साधारणपणे मुंबईला तेव्हा काय आणि आता काय तुम्ही मित्राच्या कार्यालयात गेले तर तो तुमचं कार्यालयात आदरतिथ्य करेल. फार तर कार्यालय संपल्यानंतर जेवण करायला हॉटेलमध्ये घेऊन जाईल. पण घरी चालण्याचा आग्रह करणार नाही. पण शिवा इंगोले हे रसायन मात्र वेगळे आहे. अगदी थोडीफार ओळख असणाऱ्या मित्रालाही त्यांनी आपल्या घराचा उंबरा दाखविला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन्माननीय वहिनीची शिवाला समर्थ साथ आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांचे सौ. वहिनींनी मनापासून स्वागत केले. त्यांना आपल्या नवऱ्याचा स्वभाव माहित होता. असा हा आमचा जिवाभावाचा मित्र. अमरावतीच्या प्रत्येक चळवळीमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. त्याच्या कवितेमध्ये त्याच्या जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे. सामाजिक भान असलेला हा कवी अनेक चांगल्या कविता चांगले लेख लिहून गेला आहे. सर्वसामान्य माणसाचे दुःख व्यक्त करताना हा कवी असे म्हणतो : ज्यांच्या घरी दिवाळी त्यांचे दिवे जळावे : हे ओठ शुष्क माझे पाण्याविना जळावे : सामाजिक भान व्यक्त करताना हा कवी किती संवेदनशील आहे हे या दोन ओळीवरून व्यक्त होते. हा सामाजिक कविता लिहून थांबणारा कवी नाही. तर तो कृतिशील कवी आहे. अमरावतीमध्ये असताना त्यांनी साहित्य मित्र सिद्धार्थ साहित्य संघाची स्थापना केली. तत्कालीन आमचे सामाजिक मित्र श्री प्रकाश दादा चौधरी, उषाताई चौधरी, जामनेकर, वाठ, रमेशचंद्र कांबळे, मनोहर परिमल, किशोर सानप, नरेशचंद्र काठोळे, बबन सराडकर, सुखदेव ढाणके अशा कितीतरी लोकांची गुंफण या माणसाने तयार केली. खरं म्हणजे अमरावतीला असताना त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. असे असतानाही शिवा इंगोलेकडे येणाऱ्या पाहुण्यांचे जाणे येणे सतत सुरूच असायचे. सन्माननीय वहिनींनीही कधी याबाबत तक्रार केली नाही.आपला घरचा माणूस म्हणूनच त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत केले आणि आजही करीत आहेत. आर्थिक अडचणीत असूनही या माणसाने मनोभावे सामान्य माणसाची सेवा केली आहे आणि तीच सेवा तसेच सामान्य माणसाचे दुःख त्यांनी आपल्या कवितेमध्ये मांडले आहे. अशा या आमच्या मित्राला जीवाभावाच्या मित्राला आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे आम्हाला देखील आमचा गौरव झाल्यासारख्या वाटते. शिवा इंगोले यांनी आपल्या वयाची सत्तरी पार केलेली आहे. पण त्यांच्यामध्ये असलेले चैतन्य त्यांना एका ठिकाणी बसू देत नाही आणि म्हणून हा कवी सतत लिहीत असतो चालत असतो. सामान्य माणसांमध्ये वावरत असतो. असे कवी आजकाल दुर्मिळ होत चाललेले आहे .शिवा इंगोले मात्र त्याला अपवाद आहेत. या संगणकीय युगाच्या वस्तूनिष्ठेतेचा त्यालाच स्पर्शही झालेला नाही. तो अजूनही आत्मनिष्ठ आहे. लोकाभिमुख आहे. लोक हा त्याचा प्राण आहे. आणि तो जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत कायम राहणार आहे. अशा या आमच्या कवी मित्राला आमच्या मित्र परिवारातर्फे मानाचा मुजरा..

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + twenty =