You are currently viewing 2020 मध्ये घरोघरी रुळलेले; पण त्या आधी कधीही न ऐकलेले ‘हे ‘ 20 शब्द

2020 मध्ये घरोघरी रुळलेले; पण त्या आधी कधीही न ऐकलेले ‘हे ‘ 20 शब्द

वृत्तसंस्था

2020 वर्षं संपत आलंय. सगळ्यांसाठीच हे वर्षं कठीण होतं. आतापर्यंतच्या सगळ्या वर्षांपेक्षा वेगळं होतं. यापूर्वी कधीही न घडलेल्या काही गोष्टी या 2020 वर्षात घडल्या.

अनेक नवे-जुने शब्द या वर्षात चर्चेत राहिले. पण काही शब्द असे होते, जे आपल्याला नव्यानेच समजले.

या 20 शब्दांनी हे 2020 चं वर्षं गाजवलं

1. कोरोना व्हायरस

2020 चं संपूर्ण वर्षं या एका शब्दाने आणि अति-सूक्ष्म आकाराच्या विषाणूने व्यापून टाकलं. 31 डिसेंबर 2019ला चीनने पहिल्यांदा जगाला वुहानमध्ये आढळलेल्या या व्हायरस आणि त्यापासून पसरणाऱ्या संसर्गजन्य आजाराविषयी सांगितलं.

कोरोना व्हायरस आणि त्यामुळे होणारा कोव्हिड-19. यामुळे सगळ्या जगातल्या लोकांवर वैयक्तिक, सामाजिक, मानसिक आणि आर्थिक परिणाम झाले.

2. Pandemic – पँडेमिक

कोणत्या प्रकारच्या आजाराची साथ पसरली तर तिला काय म्हणतात, हे शाळेत शिकवलं जातं. पण 2020 वर्षामध्ये Pandemic हा शब्द सगळ्यांच्या मनावर कोरला गेला. पँडेमिक म्हणजे जगभर पसरलेली साथ. कोरोनाची ही जगभर पसरलेली साथ पूर्णपणे आटोक्यात यायला मोठा कालावधी लागणार असल्याचं WHOने म्हटलंय. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लस हे महत्त्वाचं माध्यम ठरणार आहे. युके, अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली आहे तर भारतामध्येही जानेवारी 2021पासून लसीकरण मोहीम सुरू करण्याची तयारी करण्यात येतेय.

3. हर्ड इम्युनिटी (Herd Immunity)

कोरोनाच्या जागतिक साथीमुळे सगळ्यांना समजलेली ही एक संकल्पना. हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची वा गटाची रोग प्रतिकारशक्ती. जितक्या जास्त लोकांच्या शरीरात कोव्हिड-19साठीची रोग प्रतिकार शक्ती निर्माण होईल, तितका त्याचा फायदा त्यांच्यासोबतच कमकुवत रोग प्रतिकार शक्ती असणाऱ्यांनाही होईल, आणि साथ आटोक्यात येईल असं हर्ड इम्युनिटी ही संकल्पना सांगते.

ही हर्ड इम्युनिटी दोन प्रकारे तयार होऊ शकते. जास्तीत जास्त लोकांना लस देऊन किंवा मग लोकसंख्येतल्या बहुतेक लोकांना तो आजार होऊन गेला तर मग त्या रोगासाठीची हर्ड इम्युनिटी तयार होते.

अधिक माहितीसाठी वाचा – कोरोनावर मात करण्यासाठी मुंबईकरांमध्ये तयार झालेली ‘हर्ड इम्युनिटी’ आहे काय?

4. लस – Vaccine

2020च्या सुरुवातीला एका नव्या विषाणूचा, नवीन आजाारचा शोध लागला आणि 2020 संपता संपता या आजारावरची लस विकसित होऊन, मान्यता मिळून लोकांपर्यंत पोहोचली देखील.

कोरोना व्हायरसवरची लस ही जगाच्या वैद्यकीय इतिहासातली सर्वात कमी वेळा विकसित करण्यात आलेली लस आहे.

लसीकरण हा शब्द प्रचलित होता. पण तो बहुतेकदा लहान वा तान्ह्या मुलांच्या लसीकरणाशी जोडला जाई.

लस कशी विकसित केली जाते, त्यासाठी किती काळ लागतो याबद्दल या 2020मध्ये चर्चा झालीच. पण त्यासोबतच ही लस विकसित करणाऱ्या अॅस्ट्राझेनका, मॉर्डना, फायझर – बायोएनटेक यासारख्या कंपन्यांची नावंही चर्चेत आली.

जगातली सर्वात मोठी लस उत्पादक असणारी भारतातली, पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूटही याच 2020 वर्षात अनेकांना समजली.

अधिक माहितीसाठी वाचा – जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात होऊ शकते- अदर पूनावाला

5. को – मॉर्बिडिटीज – (Co-morbidities)

मराठीमध्ये या संकल्पनेला सहव्याधी म्हणता येऊ शकतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला इतर कोणते दीर्घकालीन आजार वा व्याधी असतील, त्यासाठीचे उपचार सुरू असतील तर त्याला को-मॉर्बिडिटीज म्हटलं जातं.

अशा सहव्याधी असणाऱ्यांसाठी कोरोना व्हायरसचा संसर्ग हा धोकादायक ठरू शकत असल्याने हा शब्द चर्चेत आला.

6. क्वारंटाईन-आयसोलेशन ( Quarantine – Isolation)

कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांमुळे इतरांना ही लागण होऊ नये म्हणून त्यांना इतरांपासून वेगळं ठेवणं गरजेचं होतं. त्यातूनच हे दोन शब्द सगळ्यांना समजले.

आयसोलेशन म्हणजे अलगीकरण. ज्या व्यक्तीला संसर्ग झालेला आहे, त्याला इतरांपासून वेगळं करणं.

आणि क्वारंटाईन म्हणजे विलगीकरण. कोव्हिड झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना किंवा कोव्हिड झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना, परदेश प्रवास करून आलेल्यांना क्वारंटाईन केलं गेलं.

देशभरात आणि राज्यातही अनेक क्वारंटाईन सेंटर्स उभारली गेली.

अधिक माहितीसाठी वाचा – क्वारंटाईन, आयसोलेशन, विलगीकरण, अलगीकरण म्हणजे नेमकं काय?

7. लॉकडाऊन-अनलॉक (Lockdown – Unlock)

22 मार्च 2020 ला एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आणि मग 24 मार्चला मध्यरात्रीपासून देशभरात कडक लॉकडाऊन लावण्याची घोषणा करण्यात आली. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार बंद ठेवण्यात आले. 31 मे 2020 पर्यंत भारतात लॉकडाऊन होता.

त्यानंतर एकेक सेवा सुरू झाली. या टप्प्याला – अनलॉक म्हटलं गेलं. अनलॉकच्या प्रत्येक टप्प्यामध्ये नियम जाहीर करत, काही सेवा सुरू होत गेल्या.

8. एसिम्प्टमॅटिक – Asymptomatic

कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाटयाने पसरण्यामागचं एक कारण होतं कोणतीही लक्षणं न आढळणारे रुग्णं. या रुग्णांना एसिम्प्टमॅटिक म्हटलं गेलं. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याची कोणतीही लक्षणं दिसत नसल्याने हे रुग्ण इतरांमध्ये मिसळून त्यांना संसर्ग होण्याचा धोका होता. पण सोबतच या रुग्णांना कोणताही त्रास होत नसल्याने त्यांचं बरं होण्याचं प्रमाणही जास्त होतं.

9. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ( Positive & Negative)

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला कोव्हिड पॉझिटिव्ह म्हणण्यात येतंय. कोव्हिड पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीवर त्याला जाणवणाऱ्या लक्षणांनुसार उपचार करण्यात येतात.

पण पॉझिटिव्ह वा निगेटिव्ह या शब्दांचे रूढ अर्थ या 2020 वर्षात बदलले. कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्तीला इतरांपासून वेगळं ठेवण्यात येतं.

10. न्यू नॉर्मल (New Normal)

कोव्हिडच्या जागतिक साथीमुळे जगभरात अनेक गोष्टी बदलल्या आणि नवीन सवयी अंगवळणी पाडून घ्याव्या लागल्या. या सगळ्यालाच नाव दिलं गेलं – न्यू नॉर्मल. अशा गोष्टी ज्या आता पुढचा काही काळ कराव्या लागणार आहेत.

घराबाहेर पडताना मास्क वापरणं, सुरक्षित अंतर पाळणं, वारंवार हात धुणं या सगळ्या गोष्टी न्यू नॉर्मलचा भाग आहेत.

11. सोशल डिस्टंसिंग (Social Distancing)

कोरोना व्हायरस हा बाधित व्यक्तीच्या शिंकण्या-खोकण्याद्वारे उडलेल्या तुषारांद्वारे संक्रमित होतो. म्हणूनच दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर असणं गरजेचं आहे. दोन व्यक्तींमध्ये किमान 1 मीटर अंतर राखावं असं WHO – वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय.

12. ई-पास (E Pass)

लॉकडाऊनच्या काळात प्रवासावर बंदी होती. लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आल्यानंतर मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली.

या काळात दोन राज्यांमधला प्रवास बंद होता आणि राज्यांतर्गत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवाना जवळ असणं गरजेचं होतं. हा परवाना होता – ई पास.

महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर जाऊन या ई-पाससाठी अर्ज करता येत असे.

13. वर्क फ्रॉम होम (Work From Home)

लॉकडाऊनमुळे जगभरात झालेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे ऑफिसचं काम घरून करणं – वर्क फ्रॉम होम. जगभरातल्या अनेक देशांनी कठोर लॉकडाऊन लावले होते. अशामध्ये अनेक क्षेत्रांमधल्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितलं.

लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतरही जगभरातले अनेक क्षेत्रांमधले कर्मचारी घरून काम करत आहेत. कोव्हिडचा अजूनही असलेला धोका लक्षात घेत अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत घरून काम करण्यास सांगितलेलं आहे. यापूर्वी वर्क फ्रॉम होमचा पर्याय न देणाऱ्या अनेक कंपन्यांनाही 2020मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय दिला.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आलेलं हे नवीन वर्क कल्चर आता अनेक कंपन्या यापुढेही सुरू ठेवण्याचा विचार करत आहेत.

14 झूम मीटिंग (Zoom Meeting)

वर्क फ्रॉम होमच्या काळामध्ये बैठका, ट्रेनिंग्स चर्चासत्रं, भाषणं यासाठी ऑनलाईन मीटिंग प्लॅटफॉर्म वापरले गेले. ही सेवा देणारी एक कंपनी – झूम (Zoom). या झूमच्या सुरक्षिततेबद्दल काही सवालही या काळात उपस्थित केले गेले.

पण या काळात झूम या कंपनीची मोठी भरभराट झाली.

झूमच्या प्रगतीकडे बघत गुगलनेही त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा घाईघाईने लाँच केली. भारतात जिओनेही अशा प्रकारची सेवा सुरू केली.

पण या लॉकडाऊनच्या काळात झूम मीटिंग हा शब्द घरून काम करणाऱ्या सगळ्यांच्याच अंगवळणी पडला. अनेक शाळा आणि क्लासेसनीही वर्ग सुरू ठेवण्यासाठी झूमचा वापर करायला सुरुवात केली.

अधिक माहितीसाठी वाचा – कोरोना काळात ‘झूम बराबर झूम’

15. आत्मनिर्भर

लॉकडाऊनच्या काळात अर्थव्यवस्थेतले सगळे व्यवहार ठप्प झाले. अर्थव्यवस्थेची गती मंदावली. या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध क्षेत्रांसाठी मदत पॅकेज जाहीर केलं. देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात स्वदेशी उद्योगांना धीर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ‘व्होकल फॉर लोकल’ ही घोषणा दिली.

याला नाव देण्यात आलं होतं – आत्मनिर्भर भारत.

20 लाख कोटींच्या या पॅकेजमध्ये एक देश, एक रेशन कार्ड यासारख्या योजना होत्या.

16. किंबहुना

लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावरून लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली. या सोशल मीडिया लाईव्ह दरम्यान मुख्यमंत्री लोकांना लॉकडाऊनचे नियम, वैद्यकीय व्यवस्था आणि यंत्रणांविषयीची माहिती आणि खबरदारीचे सल्ले देत.

या काळात त्यांची वकृत्व शैली लोकप्रिय झाली. ‘किंबहुना’ या शब्दाचा मुख्यमंत्री वारंवार करत असलेला वापर, भाषणातले शिवरायांचे दाखले आणि ऐतिहासिक संदर्भ या सगळ्याचीच चर्चा झाली.

17. नेपोटिझम

14 जून 2020 ला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या हत्येमागची कारणं शोधताना अनेक गोष्टींवरून चर्चा झाली. यामध्ये बॉलिवुडमधल्या नेपोटिझमचा – आपल्या ओळखीच्याच वा नात्यातल्या लोकांनाच काम देण्याचा मुद्दा चर्चिला गेला.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमागचं एक कारण नेपोटिझम असू शकतं अशी चर्चा त्याच्या मृत्यूनंतर लगेच सुरू झाली. इंडस्ट्रीतल्या अनेकांनी सोशल मीडियावर सुशांतच्या मृत्यूविषयीचं दुःख व्यक्त केलं. तर अनेकांनी नेपोटिझमविषयीची नाराजी व्यक्त केली.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या त्याच्या अनेक फॅन्सनी हळहळ तर व्यक्त केलीच, पण सुशांतला श्रद्धांजली वाहणाऱ्या इतर सेलिब्रिटीजच्या पोस्टवर टीकाही केली. करण जोहर, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर या सेलिब्रिटींना फॅन्सनी धारेवर धरलं.

18. अँटीबॉडीज आणि इम्युनिटी (Antibodies & Immunity)

मानवी शरीरातली रोगप्रतिकार शक्ती – Immunity ही शरीरामध्ये शिरणाऱ्या विषाणूशी प्रतिकार करते.

एखाद्या रोगाशी लढण्यासाठी लागणारी शरीरात तयार होणं म्हणजेच – अँटीबॉडीज.

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन गेलेल्या लोकांच्या शरीरात त्यासाठीच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आढळतात. याच अँटीबॉडीज किती लोकांच्या शरीरात आहेत याच पाहणी सिरो सर्व्हेमध्ये करण्यात येते आणि त्यावरून लोकसंख्येतल्या किती लोकांना संसर्ग होऊन गेला आहे, याचा अंदाज बांधण्यात येतो.

अधिक माहितीसाठी वाचा – कोरोनाचा संसर्ग झाला की नाही हे सांगणारी अँटीबॉडी टेस्ट कशी केली जाते?

19. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिविर, फ्लाविपॅरिव्हीर (Hydroxychloroquine, Remdesivir, Flaviparivir)

कोरोना व्हायरसवर थेट, प्रभावी औषध अजूनही उपलब्ध नाही. पण यावर कोणतं औषध परिणामकारक ठरू शकतं, याविषयी जगभरात संशोधन करण्यात आलं.

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिविर आणि फ्लाविपॅरिव्हीर ही औषधांची नावं या 2020च्या वर्षात चर्चेत आली. ती कितपत उपयोगी आहेत, साईड इफेक्ट्स या सगळ्याविषयीही चर्चा झाली.

अधिक माहितीसाठी वाचा – ‘हे’ औषध कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी उपयोगी पडेल?

या सगळ्यासोबतच काही वाक्यंही या 2020वर्षात चर्चेत राहिली.

20. रसोडा

संगीतकार यशराज मुखाते यांनी केलेलं एक व्हिडिओ मीम (Video meme) सप्टेंबर 2020 मध्ये व्हायरल झालं. एका मालिकेतल्या संवादांना संगीत देऊन करण्यात आलेली ‘रसोडेमें कौन था’ ही धुन लोकप्रिय झाली.

यशराज मुखाते यांनी केलेले इतर व्हिडिओजही नंतर गाजले.

प्रतिक्रिया व्यक्त करा