निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायिकांनी मुक्कामाला येणाऱ्या नागरिकांची ओळखपत्रे तपासा – सौरभ अग्रवाल
ओरोस
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी खाजगी हॉटेलमध्ये मुक्कामासाठी येणाऱ्या पर्यटक व नागरिकांची ओळखपत्र तपासणी, संशयास्पद हालचाली आणि हॉटेल रूम मध्ये अंमली पदार्थ सेवन करीत असलेल्या नागरिकांची माहिती तात्काळ पोलीस विभागास कळवावी अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांना केल्या.
लोकसभा निवडणुक शांततेत व सुव्यवस्थीत पार पडावी याकरीता पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी जिल्ह्यातील हॉटेल, लॉज मालकांची गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश अधिकारी, जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्यासह जिल्ह्यातील हॉटेल व लॉज मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीमध्ये आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ शांततेत पार पडावी, कोठेही अनुचित प्रकार घडू नये, या करीता हॉटेल मध्ये मुक्कामा करीता येणारे पर्यटक नागरीक यांचे ओळखपत्र घेवुन रजिस्टर व्यवस्थित भरुन ते जतन करणे, संशयास्पद हालचाली आणि हॉटेल रुम मध्ये अंमलीपदार्थ सेवन करीत असलेल्या लोकांची माहिती तात्काळ पोलीस विभागास कळविणे या सुचना देतानाच सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आणि अग्नीशमन यंत्रणा सुरळीत ठेवुन दक्षता घेण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या.
परदेशी नागरीक हे वास्तव्यास असताना त्यांच्याकडुन विहीत नमुन्यातील अर्ज भरुन ते संबंधित पोलीस ठाण्यात सादर करण्याच्या सुचना हॉटेल, लॉज मालकांना देण्यात आल्या. यासर्व सुचनांचे पालन करीत असतांना विनाकारण पर्यटकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतची सुचना देण्यात आली. यावेळी हॉटेल व लॉजेस मालक यांच्याशी चर्चा करुन त्यांना येणार्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.