कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला, ९० टक्के मतदान हवेच
*आमदार नितेश राणे यांनी कणकवली शहराच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना केले आवाहन
*ठाकरे सरकार असताना कणकवली शहरावर अन्याय केला
*माहितीच्या सरकारने कणकवली शहराला भरभरून दिले
कणकवली :
कणकवली शहरातील महायुती च्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत झटून कामाला लागा. मागील पाच वर्षांत कणकवली शहराचा केलेला विकास जनतेसमोर आहे. स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून कणकवली नगरपंचायत ची सत्ता २०१८ साली ताब्यात आली. आता भाजपा च्या झेंड्याखाली आपण सर्व एकवटलेले असल्याने आपली ताकद दुप्पट झाली आहे. २०१८ साली ७० टक्के मतदान आपल्याला झाले होते. यावेळी ८०% ते ९० टक्के मतदान कणकवली शहरातून महायुती ला व्हायला हवेय. ठाकरे सरकारने कणकवली नगरपंचायत च्या विकासकामांत नेहमी खोडा घातला. पाठवलेल्या विकासकामांच्या प्रस्तावाला केराची टोपली कायम दाखवली. याचा जाब विनायक राऊत याना शहरवासीयांनी विचारला पाहिजे. एकीकडे भाजपा नेत्यांवर टीका करायची आणि दुसरीकडे डोंबिवलीत जाऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाऊन भाजपात येण्यासाठी विनवणी करायची, राणेंमुळे मला लाल दिव्याची गाडी मिळाली नाहीतर माझ्या नशिबात लाल दिवा नव्हता, मला जवळ घ्या असा संदेश विरोधक देत असल्याची टीका नाव न घेता आमदार नितेश राणे यांनी केली. राज्यात महायुती चे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सढळ हस्ते विकासनिधी दिला. कणकवली शहर हा आमचा बालेकिल्ला आहे. कणकवली म्हणजे राणे साहेब हे वर्षानुवर्षे समीकरण आहे. कणकवली शहरात नवीन डीपी रोडचे जाळे विणले असून शहरातील वाहतूक कोंडी ची समस्या सुटली आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली शहर महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा मातोश्री मंगल कार्यालयात संपन्न झाला. त्यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते.
व्यासपीठावर केद्रीय मंत्री नारायण राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका राजश्री धुमाळे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अनुसूचित सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.