काजू बागायतदारांना अखेर १३० प्रति किलोला दर मिळणार…
सावंतवाडी
जिल्ह्यातील काजू बागायतदारांना अखेर १३० रुपये प्रति किलो असा दर मिळणार आहे. याबाबतचा सकारात्मक निर्णय आज मंत्री दीपक केसरकर व बागायतदार व कारखानदारांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गेले काही दिवस सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला. दरम्यान यातील १२० रुपये कारखानदारांकडून देण्यात येणार आहे तर १० रुपये आचारसंहितेनंतर शासनाकडून अनुदान मिळणार आहे, असे मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान यावर्षी पुरता हा दर आपल्याला मान्य आहे. मात्र स्वामीनाथन आयोगाप्रमाणे पुढील वर्षी पर्यंत १९७ रुपये दर आम्हाला मिळावा ही आमची मागणी असणार आहे, असे फळबागदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास सावंत यांनी सांगितले.
सिंधुदुर्गातील काजू बिला स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर १९७ रुपये दर मिळावा अशी मागणी सिंधुदुर्गातील शेतकरी व फळबागातदार संघाच्या वतीने लावून धरण्यात आली होती. मात्र याबाबत काहीच तडजोड होत नसल्याने शेतकरी नाराज होते, त्यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती, हा तिढा सोडवण्यासाठी मंत्री केसरकर यांनी पुढाकार घेतला होता, शिवाय शासनाकडूनही काजू बीला किलोमागे १० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. मात्र या संदर्भात ठोस निर्णय झाला नव्हता, त्यामुळे शेतकरी फळबागायतदार संघामध्ये नाराजी कायम होती. याकरिता शेतकरी, फळबागायतदार संघ व कारखानदारांना बैठकीसाठी मंत्री केसरकर यांनी आज सावंतवाडीत बोलावले होते. या बैठकीमध्ये काजू बागायतदारांची नाराजी दूर करत त्यांना शासनाचे अनुदान पकडून १३० रुपये दर देण्याचे निश्चित करण्यात आले.
यासंदर्भात माहिती देताना केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांची काजू बी खरेदी करताना बाजारपेठेत ११० रुपये दर असलेला काजू ११५ रुपये तर ११५ रुपये दर असलेला काजू १२० रुपयांना विकत घेण्याचे मान्य केले. या दरामागे शासनाकडून मिळण्यात येणारे १० रुपयाचे अनुदानही देण्यात येणार आहे, त्यामुळे ११५ रुपयांच्या काजूला १२० रुपये तर १२० रुपयाच्या काजुला १३० रुपये दर मिळणार आहे. हा दर उद्यापासून काजू बागायतदारांना देण्यात येईल तर शासनाकडून जाहीर करण्यात आलेले अनुदान आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येईल असे स्पष्ट केले.
बैठकीत झालेला निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सिंधुदुर्ग शेतकरी फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विनायक सावंत यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, कारखानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, बिपिन वरसकर, सुधीर झाटये, बापू पोकळे, परशुराम वारंग, दीपक ठाकूर, सूर्यकांत गवस, सिद्धेश शिरोडकर, सुरेश नेरुळकर, विनिता शिरोडकर तर शेतकरी फळबागायदारांमध्ये संजय देसाई, राकेश धरणे, आकाश नरसुले, निलेश सावंत, प्रदीप सावंत, जगदेव गवस, घनश्याम नाईक, जनार्दन नाईक आदी उपस्थित होते.