पेडणे अबकारी विभागाच्या कारवाईत पत्रादेवी चेकपोस्टवर दारुसह ८० लाखांचा मुद्देमाल जप्त
बांदा
गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकमधून ४२ लाख ६३ हजार रुपयांची दारू पकडण्यात गोवा अबकारी विभागाला यश आले आहे. महाराष्ट्र – गोवा सीमेवर पत्रादेवी चेकनाक्यावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बायोमेट्रिक कचऱ्याचे लेबल लावून त्यामागून गोवा बनावटीची दारू वाहतूक करण्यात येत होती. तपासणी नाक्यावरील एक्साइजच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
दारुसह वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे ३८ लाख रुपये किमतीचा ट्रक (एमएच ४० सिओ १८०१) असा एकूण ८० लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ट्रक चालक धर्मेंद्र याला ताब्यात घेण्यात आले असून तो उलटसुलट माहिती देत असल्याचे एक्साइज अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. गोव्यातून महाराष्ट्रात केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याची करडी नजर असून तसे आदेश अबकारी विभागाचे कमिशनर यांनी दिले आहेत.
सदर कारवाई एक्साइज अधिकारी राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्स्पेक्टर वासुदेव गावस, गार्ड महेश गावकर, असिस्टंट गार्ड भारत पाट्ये, रुपेश रेडकर, विनीत थोरात, आशिष फर्नांडीस यांच्या पथकाने केली.