You are currently viewing गुढीपाडवा

गुढीपाडवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*गुढीपाडवा*

 

शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्व आहे. या संदर्भात एक अख्ख्यायिका आहे.

 

शालिवाहन राजाने मातीची माणसे बनवली. त्यावर पाणी शिंपडून त्यांच्यात प्राण भरला आणि हेच होते शालिवाहनाचे सैन्य. या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला. या विजया प्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचांग वाचन आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते.

 

महाभारतातील आदीपर्वा मध्ये *उपरीचर* नामक राजाने इंद्रा कडून मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीत रोवली आणि त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. नवीन वर्षाचा आरंभ दिन म्हणून या दिवसाला गुढीपाडवा असे म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे.

 

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती याच दिवशी आणि पुढे सत्य युगाची सुरुवात झाली. या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न करतो.

 

भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा वध केला तोही दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.

 

लंकाधीश रावणाचा वध करून श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येस परतले आणि अयोध्या नगरवासीयांनी घरावर गुढ्या, तोरणे उभारून आनंदोत्सव साजरा केला म्हणूनच गुढीपाडवा म्हणजे विजय दिन. हा दिवस देशभर साजरा केला जातो.

 

गुढीपाडवा साजरा करण्या संदर्भात अशा अनेक आख्यायिका आहेत पण या दिवसा मागे एक निसर्ग तत्त्वही आहे. गुढीपाडव्या निमित्ताने त्याचाही विचार व्हायला हवा.

शिशिरातील पानझडी नंतर ऋतुचक्र हळुवार कूस पालटते आणि पर्णहीन वृक्षांना नवचैतन्याची चाहूल लागते, रंगविभोर फुलांनी डवरलेल्या वृक्षाचं पुष्पवैभव, आंबेमोहराचा सुगंध, कोकिळेचा वसंत पंचम एका सर्जनशील ऋतुच्या आगमनाची वर्दी घेऊन येतो. रंग, रूप, गंध! नाद स्पर्शातील शालीनता म्हणजे वसंतागमनाची नांदी आणि त्यासाठीच गुढीपाडव्याच्या निमित्ताने केलेला चैत्र शुद्ध प्रतिपदेचा, नववर्षाचा, आरंभाचा आनंदोत्सव.

*युगादि* तथा *उगादी* या नावानेही हा दिवस साजरा केला जातो. (आंध्र प्रदेशात) पडव, पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पाडवा. याचा अर्थ चंद्राची कला. चैत्रशुद्ध प्रतिपदे नंतर चंद्र कले कलेने वाढतो म्हणून यास *चैत्र पाडवा* म्हणतात. आपले पूर्वज निसर्गा विषयी कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्य, चंद्र, पर्वत, नदी, वृक्ष यासारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा करायचे त्यातूनच या प्रतीकात्मक गुढीची निर्मिती झाली.

 

गुढी म्हणजे ब्रह्मध्वज— विजय ध्वज. पराक्रम, विजय, सर्जनशीलता, उत्पत्ती आणि चैतन्य यांचे प्रतीकात्मक पूजन म्हणजे गुढीपाडवा.

 

घराचा दरवाजा, खिडकी, अथवा गच्ची भोवतालची जागा स्वच्छ करून धान्य आणि रांगोळीने सजलेल्या पाटावरून मोकळ्या आकाशात सहा ते सात फूट उंचावर एक काठी उभारावी त्यावर साडी व जरीचे वस्त्र गुंडाळावे, वरती तांब्याचा किंवा कोणत्याही धातूचा कलश उपडा ठेवावा, फुलांची माळ, कडुनिंबाचा पाला आणि साखरगाठीने काठी सजवावी.

 

अशा रीतीने गुढीची पूजा करण्यामागे काही शास्त्रीय संदर्भ आहेत. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज हे मनुष्य देहाचेही प्रतीक आहे. गुढीसाठी वापरण्यात येणारी काठी म्हणजे आपल्या मेरुदंडाचे, मणक्याचे,कण्याचे प्रतीक आहे. शरीराला ताठ उभे करण्यासाठी जसा मणका गरजेचा तसा गुढीचा हा बांबू! शरीर केवळ हाडांसह चांगले कसे दिसेल? त्यावर मासाचे आवरण असते म्हणून बांबूला रेशमी वस्त्रादी गोष्टींने सजविले जाते आणि त्यावर मस्तकरुपी कलश ठेवला जातो.

वैज्ञानिकतेच्या नजरेतूनही याचे महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रजापतीच्या प्रकाश लहरी सर्वाधिक प्रमाणावर धरतीवर येतात. गुढीवरचा उपडा कलश म्हणजे जणू काही डिश अँटेनाच. तो वातावरणातल्या या लहरी खेचून घेतात आणि या लहरींचा स्पर्श छताखाली राहणाऱ्या लोकांना होतो. या लहरींनी जमिनीची उत्पादन क्षमता ही वाढते म्हणूनच शेतकरी या महिन्यात शेतीची नांगरणी करतात.

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांचंही खूप महत्त्व आहे. गुढीचा प्रसाद म्हणून धणे, गुळ आणि कडुनिंबाचा पाला यांचे एकजीव मिश्रण दिले जाते. कडूनिंब म्हणजे पुराणातला परिभद्र वृक्ष. हा संजीवक वृक्ष आहे आणि यांच्या पर्णसेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चैत्रात हा नवी पालवी धारण करतो म्हणून नवचैतन्य देणाऱ्या कडूनिंबाचे या दिवशी फार महत्त्व आहे.

 

कडुनिंबाचं कडूपण आणि साखरगाठीचा गोडवा …किती सूचक मिश्रण आहे हे! माणसाचं जगणं असंच असतं ना थोडं कडू थोडं गोड. काही वेळा कटू बोलावं लागतं, ऐकावही लागतं आयुष्यातली कडू ही चवही अपरिहार्य आहे आणि असं बघा सगळंच गोड असतं तर जगण्यासाठी काही आव्हान उरलं असतं का?

 

आता या सणा मागची आणखी एक गंमत! थोडा मिस्कीलपणा! ज्यात आपलं बालपण सांचलेलं आहे. चिडवत होता की नाही तेव्हा ….”गुढीपाडवा आणि नीट बोल गाढवा”

आता याचा विचार करताना वाटते या गमतीदार शब्दसमूहात केवळ यमकच नव्हे तर एक सहज मारलेली आपुलकीची टप्पल आहे हो! जगण्याचं भान देणारी टप्पल.. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त मिळणारा एक आनंदाचा संकेत आणि संस्कार.

 

आपणा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!

 

*राधिका भांडारकर पुणे*

 

*संवाद मिडिया*

 

*♟️ऑनलाईन बुद्धिबळ प्रशिक्षण♟️*

 

*सविस्तर वाचा 👇*

——————————————

♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️

 

लहान मुलांसाठी (6 वर्ष ते 15 वर्षे वयोगटातील) ऑनलाईन बुद्धिबळ प्रशिक्षण

 

*👉 रात्री – 8.00 वाजता*

*👉 माफक फी*

*👉 मर्यादित प्रवेश*

 

प्रशिक्षण विषय – बुद्धिबळ बेसिक माहीती (नवीन खेळाडूसाठी), बुद्धिबळ खेळातील मध्य खेळात वापरल्या जाणाऱ्या युक्ती व tactics व त्यावर सराव तसेच बुद्धिबळ ला अनुसरून ईतर मार्गदर्शन

 

बुद्धिबळ ट्रेनिंग विषयी अधिक करिता खालील लिंकवर क्लिक करा व ग्रुप मध्ये सहभागी व्हा

 

https://chat.whatsapp.com/Cvc7dTlpki9DWp6z0f5OB8

 

🏁🏁🏁🏁🏁🏁🏁🏁

श्री चेस अकॅडमी कणकवली

श्रीकृष्ण आडेलकर

9422381949 /9405928919

♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 − three =