You are currently viewing ऋतू बरवा…

ऋतू बरवा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ऋतू बरवा…*

*प्रियलोचन वृत्त*(८-८-८-५)

 

वर्षारंभी बहर फुलांना आला माझ्या अंगणी

नटुनी थटुनी वसंत आला सृष्टी दिसली देखणी ||धृ||

 

गुढी उभारुन दारावरती स्वागत करितो आगळे

वसंत ऋतुच्या आगमनाचे सुरू जाहले सोहळे

आम्रतरूवर पिकता आंबे उन्हात हसली चांदणी

नटुनी थटुनी वसंत आला सृष्टी दिसली देखणी ||१||

 

पिवळा धम्मक सोनबहावा हळदीत जणू रंगला

लालचुटुक गुलमोहर अपुल्या रंगामध्ये दंगला

बोगनवेली नि मधुमालती कुंपणावरी मांडणी

नटुनी थटुनी वसंत आला सृष्टी दिसली देखणी ||२||

 

पहाटकाली कूजन करिते कोकिळ पक्षी सुखाने

कैरी पन्हे उस रस सरबत गर्मीचे हे बहाणे

आंबा काजू अन् फणसाची वाढत जाते मागणी

नटुनी थटुनी वसंत आला सृष्टी दिसली देखणी ||३||

 

ऋतुंमधे मी वसंत म्हणतो श्रीकृष्ण इथे स्वतःला

वसंत म्हणुनी मधुमास खरा गंध गगनी पसरला

चैत्र भासला मज कुसुमाकर शृंगारिक जणु साजणी

नटुनी थटुनी वसंत आला सृष्टी दिसली देखणी ||४||

 

© दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा