ग्रंथ हे मानवी जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावतात…
विरसिंग वसावे; कुडाळ येथे आयोजित सिंधुदुर्ग ग्रंथोत्सवाचे उद्घाटन…
सिंधुदुर्गनगरी
पुस्तके अथवा ग्रंथ यांच्या सारखा दुसरा गुरु नाही. ग्रंथ हे आपल्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ विषयक ज्ञान देतात. त्यामुळे ग्रंथ हे मानवी जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावितात, असे प्रतिपादन कुडाळचे तहसिलदार विरसिंग वसावे यांनी कुडाळ येथे केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे सिंधुदुर्ग ग्रंथोत्सवाचे आयोजन कुडाळ येथील रा.ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, ज्येष्ठ साहित्यिक अनंत वैद्य, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मंगेश मसके आदी उपस्थित होते.
श्री.वसावे म्हणाले, ‘वाचाल तर वाचाल’ असा मंत्र सांगितला जातो, ते उगीच नाही. बौध्दीक आणि सामाजिक विकासामध्ये ग्रंथ आणि ग्रंथालयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या पिढीवर असे संस्कार करण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही असेही ते म्हणाले.
श्रीमती शिंपी म्हणाल्या, सध्याच्या डिजिटल युगात वाचनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जगातली ग्रंथसंपदा एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने तरुण पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढणे आवश्यक आहे. तरुणांनी वाचनातील नवनवीन गोष्टी एकमेकांशी शेअर कराव्यात असेही त्या म्हणाल्या.
श्री. चिलवंत म्हणाले, बालपणापासूनच मुलांमध्ये वाचनाची गोडी लावणे आवश्यक आहे. सर्वांनीच मोबाईलचा उपयोग केवळ कामापुरता करुन वाचनाची सवय अंगिकारावी. दिवसातून किमान 2 तास वाचनासाठी देणे आवश्यक आहे. वाचनामुळे ज्ञानाचे भांडार वाढते आणि आपण परिपक्व होतो. श्री मसके म्हणाले युवा पिढीला वाचनाची गोडी लावण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांमार्फत विविध उपक्रम राबविले जाणे आवश्यक आहे. वाचनातूनच संस्कार होतात. वाचनातून समाज प्रबोधनाचे काम होते.
श्री वैद्य म्हणाले, मुलांवर घरातुनच संस्कार होत असतात. पालकांचे अनुकरण मुले करत असल्याने पालकांनी स्वत: वाचनाची सवय अंगिकारणे आवश्यक आहे. वाचनामुळे मुलांची निरीक्षण शक्ती वाढते आणि जिवनाला वेगळी दिशा मिळते असेही ते म्हणाले.