You are currently viewing कुडाळ येथील अष्टपैलु शिक्षक हृदयनाथ गावडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर

कुडाळ येथील अष्टपैलु शिक्षक हृदयनाथ गावडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेंडोली आवेरे, येथील उपक्रमशील अष्टपैलु शिक्षक श्री.हृदयनाथ गावडे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम. एस.पी) चा राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्री.दिपक डवर,  श्री.शिवराज सावंत, सौ.संपदा बागी, श्री.शितल देवरकर या जिल्हा निवड समिती प्रमुखांद्वारे त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शिक्षक पॅनल टीमच्या वतीने सिंधुदुर्ग निवड समिती प्रमुख श्री.शिवराज सावंत यांच्या शुभहस्ते श्री.हृदयनाथ गावडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक ) पुरस्कार निवड पत्र व शाल देऊन गौरवण्यात आले.

श्री.हृदयनाथ गावडे हे उच्च विद्या विभूषित असून कीर्तन विशारद, गांधर्व महाविद्यालयाची गायन मध्यमा, पत्रद्वारा दासबोध अध्ययन समीक्षक या परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. श्री.हृदयनाथ गावडे सर यांना सन २०२१ मध्ये मालवण कथामालेचा शिक्षणतज्ज्ञ जी. टी.गांवकर सेवामयी शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

मसुरे नं.१ शाळेत कार्यरत असतेवेळी तब्बल ४० प्रयोग केलेला मुलींच्या दशावतारास श्री.हृदयनाथ गावडे यांची संगीत साथ लाभली होती.विद्यार्थी विकासासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून त्याद्वारे विद्यार्थी प्रगती करण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात.

महाराष्ट्र शासनाच्या जीवन शिक्षण मासिकामध्ये त्यांनी अनेकदा लेखन केले असून विविध वृत्तपत्रात ललित लेखन व कविता लेखन सतत करत आले आहेत.विविध स्पर्धा परीक्षा तसेच सहशालेय स्पर्धा यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थी यश संपादन केले आहे.श्री.हृदयनाथ गावडे सर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार असून विविध विषयावर त्यांनी अनेक कीर्तने केली आहेत. त्याचप्रमाणे समूहगीत, समुहनृत्य,वक्तृत्व, गीत गायन स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून ते उत्तम कामगिरी बजावतात. पालक संपर्कातून शाळेच्या शैक्षणिक उठावासाठी त्यांचे नियमित योगदान असते.

विविध तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले आहे. कीर्तन, हार्मोनियम वादन , गायन, अभिनय , दशावतार, लेख -कविता लेखन , संगणकाचा वापर अशा सर्वच क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या श्री.हृदयनाथ गावडे सर यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक येथे १४ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा