देऊळवाडा प्राथमिक शाळेला गोष्टीची पुस्तके भेट!
मालवण
वाचन ही व्यक्तिमत्व विकासाची एक महत्त्वाची पायरी आहे. वाचनाने माणूस बहुश्रृत होतो. लहान मुलांना बाल वयातच वाचनाची सवय लावणे फार आवश्यक आहे. यासाठीच शाळांमध्ये वाचन महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. याच उपक्रमाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मसूरे देऊळवाडा या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी श्री. नित्यानंद कबरे यांनी ५ हजार रुपये किमतीची गोष्टीची वाचनीय पुस्तके भेट दिली. “या पुस्तकांचा उपयोग वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमितपणे करावा,” असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सदानंद कबरे यांनी केले.
श्री. कबरे यांच्या या पुस्तकरुपी देणगीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर, सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.