ओटवणे शेरवाळवाडी येथे नारळ बागेत लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान
सावंतवाडी
ओटवणे शेरवाळवाडी येथे नारळ बागेत लागलेल्या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले. ही घटना सकाळी अकराच्या दरम्यान घडली. सावंतवाडी पोलीस ठाण्यात याची माहिती मिळतात पोलीस हे. कॉ.रामदास जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल एम. के .जाधव , पोलीस पाटील लक्ष्मण उर्फ शेखर गावकर घटनास्थळी दाखल होत घटनेची पाहणी केली.
सावंतवाडी येथून नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. अग्निशमन दलाचे अमोल शितोळे, पांडूरंग कोळापटे अग्नीशमनसह तत्काळ हजर झाले. मात्र, बागेपर्यंत जाण्याचा मार्ग नसल्याने त्यांना आगीच्या काही अंतरावरून माघारी परतावे लागले. या आगीत सुमेद गावडे, मंगेश गावडे यांचे लाखो रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले. बागेतील नारळाच्या झाडांना पूर्णतः आगीने वेढा घातल्यामुळे माडांचेही मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर सुमेध गावडे यांच्या बागायतीमधील पाण्याची पाईपलाईन सह पाण्याची मोटर जळाली. अग्निशमन दलाच्या सायरनचा मोठा आवाज झाल्यामुळे गावात मोठी दुर्घटना घडली असावी असा अंदाज ग्रामस्थांना आल्यामुळे ग्रामस्थांनी धाव घेतली.
बागेतील आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आगीचे रुद्र रूप पाहता आग नियंत्रणाच्या बाहेर जात होती. काही अंतरावर अग्नीशमन दलाची गाडी होती मात्र रस्ताच नसल्यानें तिथपर्यंत पोहोचणे शक्य न झाल्याने ग्रामस्थांनीच अथक प्रयत्नांनी आग विझविली. भर दुपारी आग लागल्याने त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. आगीत बऱ्याच अंशी प्रमाणात बागायती मधील लागती माडाची झाडे जळल्याने, पाईप लाईन जळून गेल्याने मोठी हानी झाली.