You are currently viewing राजन आंगणे… जनसामान्यांचा हिरा…!

राजन आंगणे… जनसामान्यांचा हिरा…!

संपादकीय….

 

मालवण वायरी येथे जन्मलेले राजन आंगणे म्हणजे जनसामान्यांचा जणू हिरा..! गरीब श्रीमंत सर्वच राजन आंगणेंचे मित्र अन् त्यांचा परिवार हा आपला परिवार अशी राजन आंगणेंची भावना..! त्यामुळेच ते सर्वांचे राजनभाई म्हणून ओळखले जात. जन्मभूमी मालवण असली तरी त्यांची कर्मभूमी ही सावंतवाडीच होती, त्यामुळे मालवणवासियां इतकेच दुःख आज सावंतवाडी वासियांना होत आहे. राजन भाई जाऊन आज दहा दिवस झाले असतानाही कितीतरी जणांची झोप उडाली आहे, स्वतःवर, स्वतःच्या डोळ्यांवर आजही त्यांना विश्वास बसत नाही. राजनभाई गेले हे मान्य करायला कुणीही तयार नाहीत, एवढं प्रेम त्यांच्या मित्रांचं राजन भाईंवर होतं. त्यांचं कार्यकर्तृत्वही तेवढंच मोठं होतं. अनेकांनी त्यांना दूरवरून पाहिलं पण ज्यांनी जवळून अनुभवलं त्यांनाच राजन आंगणे कोण होते..? त्यांची कीर्ती काय होती..? त्यांची महती काय होती याची जाण आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, चिरकाल हृदयात जिवंत ठेवण्यासाठी आज सावंतवाडीतील राजन आंगणे प्रेमी मित्रपरिवाराने भाईंना श्रद्धांजली देण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे. राजन भाईंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने या सभेला सायंकाळी ५.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर समोरील कट्ट्यावर आलंच पाहिजे.
राजन भाईंचे बालपण वायरी मालवण येथे गेले. पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण त्यांचे वायरी येथील अंबाजी विद्यालयात झाले. पाचवी ते सातवी पर्यंत वायरी येथीलच लायब्ररी स्कूलमध्ये ते शिकले, व त्यानंतर हायस्कूलचे शिक्षण मालवण येथील भंडारी हायस्कूलमध्ये झाले. मालवणच्या स. का. पाटील महाविद्यालयातून त्यांनी पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शाळा कॉलेजच्या दिवसातच त्यांच्या अंगी इतरांना मदत करण्याचे गुण असल्याचे दिसून आले. राजन कुणाला मदत करायला गेला म्हणजे ते काम फत्ते करूनच येणार याची प्रत्येकाला खात्री असायची. राजनला काम सांगितले म्हणजे ते झालेच समजा अशा प्रकारची धारणा प्रत्येकाची असायची. राजननी शाळा कॉलेजच्या दिवसापासूनच मोठा मित्रपरिवार जमवला होता. मित्रांमध्ये तो मित्रांसारखा वागायचाच परंतु आपल्या सख्ख्या भावंडांबरोबर म्हणजे मोठे बंधू आनंद व कनिष्ठ बंधू संजय यांच्याशी सुद्धा तो मित्रांसारखाच वागायचा. आनंद हे मोठे बंधू असले तरी कुटुंबाची जबाबदारी राजननेच मोठ्या शिताफीने पेलली होती. त्यामुळे आंगणे कुटुंबीयांचा राजन हा मोठा आधार होता.

*निडर व्यक्तिमत्त्व म्हणजे राजन आंगणे*

राजन आंगणे यांनी कधीही कुठल्या गोष्टीची भीती बाळगली नाही. राजन यांची एक जुनी आठवण सांगताना मोठे बंधू आनंद आंगणे यांनी त्यांच्या निडरपणाची गोष्ट सांगितली. मालवण भरड परिसरात राजनच्या एका मित्राचा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खून झाला होता. त्यावेळी त्या गुंडांना घाबरून प्रत्यक्षदर्शी कोणीही साक्ष म्हणून समोर यायला तयार नव्हते. अशावेळी आपल्या मित्राला न्याय मिळवून देताना राजन यांनी एकट्याने निडरपणे कोर्टात साक्ष देऊन आरोपींना शिक्षा होण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे राजन आंगणे हे निडर व्यक्तिमत्व म्हणून मालवणमध्ये ओळखले जात होते.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसायाकडे ओढा असणाऱ्या राजन यांनी आपल्या छोट्या बंधू समवेत आंबा व्यवसाय केला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथे श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची आंबा बाग कराराने घेत काही वर्षे आंबा व्यवसाय केला. त्याचप्रमाणे कोळंबी शेती (प्रॉन्स फार्मिंग) देखील केली. शाळेतील वडार समाजातील राजन यांचा मित्र रंगनाथ याच्या घरी काही वेळा त्याचे जाणे व्हायचे. त्यावेळी रंगनाथचे वडील दगड फोडून घामाघूम होऊन घरी येत असताना त्याने पाहिले. नंतर रंगनाथ याच्या सोबतीने ऑटोमॅटिक दगड कसा फोडला जाईल याचा अभ्यास करून दगडखाणींचा व्यवसाय करण्याचे मनात ठाणले आणि आपला मित्र रंगनाथ याच्याच मदतीने सावंतवाडी जवळील कारिवडे गावात जागा घेत अध्ययावत अशी मशिनरी आणून स्वतःचा काळ्या दगडाचा खाण व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाचे पुढे विस्तारीकरण करत सिंधुदुर्गातील मोठा काळ्या दगडाचा खडी क्रशर उभारला आणि याच क्रशर व्यवसायातून प्रगती करत राजन आंगणे सावंतवाडीत नावारूपास आले. त्रिमूर्ती स्टोन क्रशरच्या माध्यमातून खाण व्यवसाय करत असताना राजन आंगणे यांनी केवळ पैसा कमविणे हे उद्दिष्ट न ठेवता आपण कमावलेल्या पैशातून दानधर्म, समाजकार्य करत लोकांसमोर आदर्श समाजकार्यकर्ता कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण ठेवले. अनेक गोरगरीब लोकांना मोफत खडी, मंदिरांसाठी मोफत दगड, खडी अशा प्रकारचे समाजकार्य नेहमीच राजन आंगणे करत राहिले. त्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्या कार्यावर प्रभावित होत त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले.

राजन आंगणे यांचा मित्रपरिवार फार मोठा होता. या मित्र परिवारांच्या सोबतीनेच सावंतवाडीत “हेल्पलाइन फाउंडेशनची” स्थापना करून गरीब होतकरू विद्यार्थी, खेळाडू आदींना आर्थिक मदत करून पुढे येण्यास सहकार्य केले. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे, खेळाडूंचे भविष्य देखील घडले. अगदी पूर्वीपासूनच मदत करण्याचा पिंड असलेल्या राजन भाईंकडे मदतीसाठी म्हणून जो कोणी गेला त्याचे काम फत्ते झालेच. मदतीसाठी गेलेला कोणीही रित्या हाताने कधीही परतला नाही. त्यामुळे राजन आंगणे यांना दानशूर व्यक्ती म्हणून समाजात प्रतिष्ठा मिळू लागली. सावंतवाडीतीलच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कितीतरी कुटुंबांच्या लग्न सोहळ्यातील छायाचित्रांमध्ये राजन आंगणे यांचे छायाचित्र असणारच.. कारण, गरीब श्रीमंत कोणीही कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्यास आपले कितीही महत्त्वाचे काम असले तरी ते बाजूला ठेवून राजन आंगणे त्या कार्यक्रमाला हजर असायचे. त्यांनी कधीही कोणाच्या निमंत्रणाचा अनादर केला नाही. त्यामुळेच जनमानसात त्यांची प्रतिमा फार उंचावली होती आणि म्हणूनच आज त्यांच्या जाण्यानंतर अनेक हृदये हेलावली, कित्येकांना अश्रू अनावर झाले, अश्रूंचे बांध फुटले.

*राजकीय क्षेत्रात राजन यांचे आदराचे स्थान*

राजन आंगणे यांची राजकीय कार्यकर्ता अशी ओळख नसली तरी राजकीय क्षेत्रात त्यांची मात्र फार मोठी ओळख होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले त्यावेळी बाळासाहेबांच्या आदेशानेच नारायण राणे यांचा बॅकअप राजन आंगणे हे होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जवळीक असलेले शिवसेनेचे एकनिष्ठ म्हणून त्यावेळी राजन आंगणे यांची ओळख होती. आजही राजकीय क्षेत्रातील अनेक नेते, लोकप्रतिनिधी राजन आंगणे यांचा आदर करतात. राजकीय क्षेत्रात त्यांच्या शब्दाला फार वजन होते. परंतु राजन आंगणे यांनी कधीही आपल्या राजकीय ओळखीचा मोठेपणा मिरवला नाही, तर जनसामान्यांमध्ये ते सामान्य म्हणूनच जगले. त्यामुळेच जनसामान्यांचा हिरा असे संबोधन आज त्यांना लाभले आहे.

*आरोग्याविषयी दक्ष असणारे राजन आंगणे*

राजन आंगणे हे हेल्थ कॉन्शियस होते. सर्वांना आरोग्याविषयी ते नेहमीच मार्गदर्शन करायचे. याबद्दल एक घटना सांगताना बंधू आनंद आंगणे यांनी राजन यांच्या जाण्यानंतर पालकमंत्री आपल्याला भेटण्यास आले त्यावेळी पालकमंत्र्यांच्या पत्नीला “वाहिनी, दादा सद्ध्या खूप धावपळ करतो आहे, दादाचे आरोग्य राखण्यासाठी त्याला वेळेत जेवण वगैरे द्या,” असा सल्ला दिल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. कारीवडे गावात कोणीही आजारी पडल्यास आपल्या खिशातील पैसे काढून देत त्याला तात्काळ डॉक्टरकडे नेण्याचा सल्ला राजन भाई नेहमीच देत. आरोग्याविषयी कोणीही हेळसांड केलेली त्यांना चालत नव्हती. नेहमी “आपले आरोग्य जपा” असे ते प्रत्येकाला सांगत असायचे. परंतु, इतरांच्या आरोग्याची काळजी घेणारे राजन भाई स्वतःची काळजी घ्यायला कसे काय विसरले..? हे मात्र एक कोडेच बनून राहिले आहे.

*जे काम करणार ते क्वालिटी करा*

राजन आंगणे यांचा नेहमीच आग्रह असायचा तो म्हणजे, जे काम करणार ते कॉलिटी मध्ये करा, दीर्घकाळ टिकलं पाहिजे अशा प्रकारचे काम झाले पाहिजे. असा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असायचा. सावंतवाडीतील एकमुखी दत्त मंदिरचे काम सुरू असताना दत्त मंदिर बांधकाम समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचा कामावर बारीक लक्ष असायचा. प्रत्येक वेळी कामगारांना ते सांगायचे “जे काही काम कराल ते लक्षपूर्वक, मन लावून नीट नेटकं करा, पैसा कितीही खर्च होऊ दे, पण काम चांगले करा. आपल्या कामाला कोणीही नाव ठेवू नये अशा प्रकारचे काम आपल्याकडून झाले पाहिजे”. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकांनी नाव काढलं पाहिजे अशा प्रकारचे दत्त मंदिर उभारूया आणि भक्तनिवासाच्या माध्यमातून लोकांना उत्तमोत्तम सेवा देऊया असा त्यांचा आग्रह होता.

*मित्र परिवार झाला पोरका*

राजन आंगणे यांचा मित्रपरिवार फार मोठा होता. सावंतवाडीतच नव्हे गोवा पणजी, मुंबई, पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची मित्रमंडळी आहेत. आज त्यांच्या जाण्याने अनेकांना मानसिक धक्का बसला आहे. काहींनी आपल्या भावना विविध माध्यमांवर शब्दातून व्यक्त केल्या आहेत. “राजन तू हवा होतास” अशी साद आजही प्रत्येकाच्या तोंडून ऐकू येते. कित्येक मित्र, त्यांचे परिवार, नेते, लोकप्रतिनिधी, सिने, नाट्य कलाकार आदी आज राजन यांच्या जाण्याने दुःखी होऊन हळहळताना दिसून येतात. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय, एकमुखी दत्त मंदिर उपसमिती सावंतवाडी सारख्या अनेक संस्थांवर ते कार्यकारिणी सदस्य म्हणून योगदान देत होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने अशा संस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्यानंतर त्यांचं कार्य अविरत सुरू ठेवणे हीच राजन भाईंना श्रद्धांजली असेल.

राजन आंगणे यांच्या जाण्यानंतर लोकांनी राजन आंगणे यांना दिलेलं प्रेम पाहून त्यांचे मोठे बंधू आनंद आंगणे भावूक झाले. “आज आम्ही त्याचे भाऊ आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो. समाजासाठी, कुटुंबासाठी असलेल्या त्याच्या इच्छा, त्याने पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू हीच आमच्याकडून राजनला श्रद्धांजली” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राजनभाईंचे अकाली जाणे त्यांच्या परिवारासह मित्रमंडळींना दुःखाच्या महासागरात लोटून गेले. अनेकांच्या ह्रदयसिंहासनावर आरूढ असलेल्या राजनभाई आंगणे यांना *संवाद मीडिया न्यूज चॅनलकडून भावपूर्ण आदरांजली*
शेवटी एवढंच म्हणेन…

*स्मृती राजन भाई*

भेट अचानक झाली जुळले मित्रत्वाचे नाते
मालवणच्या या सुपुत्राचे भाग्यवान मैतर होते

शर्ट कधी टी शर्ट अन् निळी जीन्स बूट काळे
पेहराव जसा तसा अंतरी वागणे नसे निराळे

हास्य विलसित प्रसन्न चेहरा भाई पाहिला नेहमी
काम त्याला काही बोला कामाची मिळेल हमी

कुणीही गेले भाईकडे खाली हात ना परतले
दातृत्वाचा वसा घेउनी होतेच जणू जन्मले

कळे कुणा न कसा आटला हा दातृत्वाचा झरा
देवालाही का आवडला जनसामान्यांचा हिरा?

स्वप्ने अनेक पाहिली ती खरी करण्या झटला
गेला जरी दूर शरीराने तो आठवांनी उरला

दुजा कुणी झाला नाही, न होणे तुजसम भाई
कित्येकांना भेटला होता राजन तुझ्यात साई

प्रतिक्रिया व्यक्त करा