शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी गुरुवारी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर 28 मार्चला होणार जाहीर
मुंबई :
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची यादी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर बाहेर येणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी ही गुरुवारी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर 28 मार्चला जाहीर होणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर लढणार, असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. अर्थात यापैकी एक जागा वंचित बहुजन आघाडीला सुटली, तर पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी 9 म्हणजे सिंगल डिजिटच जागा लढणार आहे.
पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या बारामती, माढा, शिरुर, सातारा, बीड, वर्धा, रावेर, अहमदनगर, भिवंडीसह 10 जागांवर लढवणार असल्याचे जयंत पाटलांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस आहे. तरी इकडे महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे आपले उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत बुधवारी दुपारी 3.00 वाजता एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा करणार आहेत. त्यामुळे कोणाला कुठून उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दुसरीकडे सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील जागेचा तिढा कायम आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या दुपारी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पुन्हा एकदा बैठक होणार असूश त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत, असे सांगितले जात आहे.